जि.प च्या नारळी बागेतील जीर्ण झालेल्या इमारती. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar ZP : झेडपीत पदाधिकाऱ्यांना घर मिळेना; रोज करावी लागतेय ये-जा !

नारळीबागेतील इमारती जीर्ण; भाडेतत्त्वावर घरे देण्याचा पर्याय प्रशासनाच्या विचाराधीन

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेतील साडेतीन वर्षांचे प्रशासकराज संपून आता महिना उलटला आहे. मात्र, नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर आता हक्काच्या निवासस्थानाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समिती सभापतींना नियमानुसार मुख्यालयी निवासस्थान देण्याची तरतूद असली तरी, सध्याची निवासस्थाने जीर्ण झाल्याने पदाधिकाऱ्यांना दररोज मूळ गावाहून मुख्यालयात ये-जा करावी लागत आहे.

नारळीबाग परिसरातील जिल्हा परिषदेच्या जागेत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. मात्र, मागील सभागृहाचा कार्यकाळ संपल्यापासून तब्बल तीन वर्षे ती पडून असल्याने देखभाल-दुरुस्तीअभावी इमारतींची मोठी दुरवस्था झाली आहे. त्यातच झेडपीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामामुळे काही विभाग थेट अध्यक्षांच्या निवासस्थानी स्थलांतरित करण्यात आले आहेत.

त्यामुळे सध्या उपलब्ध इमारती राहण्यायोग्य नसल्याने, पदाधिकाऱ्यांना भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देण्याचा पर्याय प्रशासनाकडून तपासला जात आहे. यासाठी रेडी रेकनर दर आणि मंजूर निधीचे गणित बांधकाम व सामान्य प्रशासन विभागाकडून जुळवले जात आहे.

अद्याप अधिकृत मागणी नाही

नव्या पदाधिकाऱ्यांकडून अद्याप निवासस्थानाची अधिकृत मागणी आलेली नसली तरी, प्रशासनाने पर्यायी व्यवस्थेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तोपर्यंत अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या मूळ गावाहूनच मुख्यालयात ये-जा करावी लागत असल्याने हा प्रश्न लवकर निकाली निघणार का, याची चर्चा झेडपी वर्तुळात रंगली आहे.

पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाईल.
किरण धनके, प्रभारी कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT