गुलमंडी भागात महिलांसाठी ई टॉयलेट उभारण्यासाठी जागेची पाहणी करताना सभापती अनिल मकरिये, सोबत महापालिका अधिकारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar women e toilet : गुलमंडी, उस्मानपुऱ्यात महिलांसाठी ई टॉयलेट

सभापती मकरिये यांचा पुढाकार, अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वाकडे

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या मुख्य बाजारपेठेत आणि प्रमुख रस्त्यांलगत महिलांसाठी स्वच्छता गृहेच बांधण्यात यावीत, यासाठी अनेक वर्षांपासून मागणी सुरू होती. परंतु, जागेअभावी प्रत्येकवेळी या कामाकडे दुर्लक्षच केले जात होते. मात्र, स्थायी समिती सभापतीपदी विराजमान होताच अनिल मकरिये यांनी गुलमंडीत महिलांसाठी ई टॉयलेट सुरू करण्याची घोषणा केली. अन् आता या कामाच्या दृष्टीने सुरुवातदेखील झाली आहे. गुलमंडी, उस्मानपुरा भागात जागाही निश्चित झाली आहे.

महापालिकेकडून शहराच्या मुख्य बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या महिलांची मोठी तारंबळ होते. अनेकवेळा महिला या त्रासामुळे खरेदी अर्धवट सोडून निघून जातात. या प्रकारामुळेच मागील दोन दशकांपासून गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली सिटीचौक, दिवाणदेवडी, भांडीबाजार या भागात स्वच्छतागृहांची मागणी होत आहे.

विविध महिला संघटनांसह नगरसेविकांकडूनही मागणी करण्यात आली. महापालिकेकडून त्यासाठी जागेचा शोधही घेण्यात आला. मात्र, गुलमंडी भागात जागाच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत स्वच्छतागृहाकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, सभापतीपदी विराजमान होताच मकरिये यांनी शहरात १६ ठिकाणी महिलांसाठी ई टॉयलेट सुरू करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार प्रत्यक्षात प्रयत्न करून मकरिये यांनी जा-गेचा शोध घेतला. त्यासोबतच प्रयोगिकतत्त्वावर ई टॉयलेटच्या कामाला सुरुवात देखील केली जाणार आहे.

गुलमंडी आणि उस्मानपुरा भागात हे टॉयलेट येत्या महिनाभरात उभारले जाणार असल्याचे सभापती मकरिये यांनी सांगितले. वेळी गलिच्छ वस्ती सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, शहर अभियंता संजय कोंबडे, शंकर म्हात्रे, किशोर मानकापे, सागर नीलकंठ यांची उपस्थिती होती.

आयुक्तांकडे बैठक

महिलांसाठी ई टॉयलेट उभारण्यासाठी शुक्रवारी आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थित बैठक झाली. त्यात प्रायोगक तत्त्वावर दोन ठिकाणी ई टॉयलेट सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT