Sambhajinagar water supply AI Image
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar water supply : वाढीव 18 एमएलडी पाणी कुठे मुरतेय ?

शहराला नवव्या, दहाव्या दिवशीच पाणीपुरवठा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शहराला ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यात सुमारे १८ एमएलडीची वाढ झाली असून, दररोज ९०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून १६० ते १६५ एमएलडी पाण्याची आवक होत आहे. असे असतानाही गॅप कमी होण्याऐवजी नवव्या, दहाव्या दिवसांवरच कायम आहे. त्यामुळे आता महापालिकेचे अधिकारीच नियोजनात नापास झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी जीर्ण झालेली ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी बंद करून त्याऐवजी ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा सुरू केला. यामुळे शहरात मागील दोन आठवड्यांपासून पाण्याची आवक १८ एमएलडीने वाढली आहे. या वाढीव पाण्यामुळे शहरातील ज्या वसाहतींना नवव्या, दहाव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात होता. त्या वसाहतींच्या पाण्याचे गॅप सहा दिवसांआड होतील, असा वादा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला होता, परंतु वाढीव पाणी मिळूनही या वसाहतींच्या पाण्याच्या गॅपवर अद्याप कुठलाच फरक पडलेला नाही. उलट शहराच्या इतरही भागांचा पाणीपुरवठा सहा दिवसांआडऐवजी आता सातव्या, आठव्या आणि नवव्या दिवसांवर गेला आहे.

दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांच्या दाव्यानंतर आता नागरिकांतून ओरड सुरू झाली आहे. अनेकांनी प्रशासन व पदाधिकाऱ्यांचे दावे फेटाळून लावले आहेत. वाढीव पाणी मिळूनही आम्हाला नवव्या, दहाव्या दिवशीच पाणी मिळत आहे. त्यामुळे वाढीव पाणी नेमके कुठे जात आहे, असा सवाल काहींनी उपस्थित केला आहे. तर काहींनी लाईनमन व्हॉल्व्ह व्यवस्थित सोडत नाही.

त्यामुळे पाणी अतिशय कमी दाबावे मिळत असून, शेवटच्या घरापर्यंत पाणीपुरवठाच होत नसल्याची तक्रार केली आहे. व्हॉल्व्ह सोडताना नगरसेवकांकडून दबाव टाकला जातो, त्यामुळेही पाणी मिळत नाही, अशा तक्रारीही अधिकाऱ्यांना प्राप्त झाल्या आहेत. सहाव्या आणि आठव्या दिवशी पाणीपुरवठा केला जात असला तरी यातीलच काही भागाला नवव्या आणि दहाव्या दिवशी पाणी मिळत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

या वसाहतींचा समावेश

जयविश्वभारती कॉलनी, मरिमाता, एन-८, रामनगर, मुकुंदवाडी, भीमनगर-भावसिंगपुरा, पडेगाव, जिन्सी, मोतीवालानगर, गुलमंडी, राजाबाजार यासह जुन्या शहरातील काही भागांना नवव्या ते दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे.

आवक १२८ हून १६५ एमएलडीवर

शहराला गेल्या महिनाभरापूर्वीपर्यंत १२८ ते १३५ एमएलडी एवढाचा पाणीपुरवठा सुरू होता. परंतु मागील दोन आवठवड्यांपासून ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे आवक १३५ हून १६०-१६५ एमएलडीवर पोहोचली आहे. तरीही गॅप जैसे थेच आहे.

अधिकाऱ्यांमध्ये बेबनाव

पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांमध्ये मागील दोन, अडीच महिन्यांपासून बेबनावाचा प्रकार दिसून येत आहे. त्यात तत्कालीन आयुक्त जी. श्रीकांत यांनी बदलीच्या एक दोन दिवसांअगोदरच काही अधिकाऱ्यांना विविध विभागांच्या जबाबदाऱ्या दिल्या. त्यात पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाची सूत्रे नव्या अधिकाऱ्याकडे दिल्याने शहराचा पुरवठाच विस्कळीत झाल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT