

Supply of Contaminated, Foul-Smelling Water in CIDCO N-6
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिडको एन-६ मध्ये नळांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असून, नळाच्या पाण्यात किडे आढळत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लहान मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे.
या समस्येबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागासह संबंधित वॉर्ड अभियंत्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली असून, अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, स्वच्छ पाणी द्या, नसता पाणीपट्टी माफ करा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून सिडको एन-६ परिसरातील नागरिकांना नळाद्वारे दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणीपुरवठ्याच्या सुरुवातीच्या १५ ते २० मिनिटांत काळपट, पिवळसर आणि तीव्र दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या समस्येबाबत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच संबंधित वॉर्ड अभियंत्यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रशासनाकडून जलवाहिन्यांमधील गळती शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
यावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. परिणामी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान या परिसरात हजारो नागरिकांना पाणीपट्टी भरूनही स्वच्छ पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वेगळा खर्च करावा लागत आहे. अशी खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
पाणी पट्टी माफ करा
यावर मनपाकडून तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अन्यथा नागरिकांना स्वतःच मार्ग काढावा लागेल, असा इशारा स्थानिक रहिवाशांकडून देण्यात आला आहे. दरम्यान, जलवाहिन्यांमधून येणाऱ्या पाण्यात काही वेळा किडेही आढळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वर्षभराचा पाणीकर भरूनही शुद्ध पाणी मिळत नसेल, तर महापालिकेने पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी मनीष नरवडे यांनी केली आहे