छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी १९३ कोटी रुपये खर्चुन टाकण्यात आलेल्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहितनीतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे शहराला मागील आठवडाभरापासून वाढीव १८ एमएलडी पाणी उपलब्ध होत असून, या वाढीव पाण्यामुळे दहा दिवसांआड पाणीपुरवठा होणाऱ्या वसाहतींसह संपूर्ण शहराला आता सहा दिवसांआड म्हणजेच ७ व्या दिवशी पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाल्याचा दावा सोमवारी (दि. २५) महापालिका पाणीपुरवठा विभागाने केला.
शहरात काही वसाहतींना दहाव्या दिवशी तर काहींना ५ व्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. यात प्रामुख्याने झोन ३ आणि झोन ४ व ५ मधील वसाहतींनाच सर्वाधिक विलंबाने म्हणजे नवव्या आणि दहाव्या दिवशी पाणीपुरवठा होतो. यात जर जायकवाडी ते नक्षत्रवाडीदरम्यान जलवाहिनी फुटण्याचा अथवा वीज पुरवठा खंडीत होण्याची घटना घडली. तर या वसाहतींना तब्बल बारा, तेरा दिवसानंतर पाणी मिळते. म्हणजे महिन्यातून केवळ २ किंवा ३ दिवसच पाणीपुरवठा होतो.
पाण्याचा हा गॅप कमी करून संपूर्ण वसाहतींना एकसमान पाचव्या अथवा सहाव्या दिवशी पाणी देण्याची तयारी मागील वर्षभरापासून प्रशासकीय यंत्रणा करीत आहे. परंतु, शहराला त्यादृष्टीने आवश्यक तेवढे वाढीव पाणी मिळत नसल्याने पाण्याचे गॅप कमी करण्यात अद्यापही प्रशासनला यश आले नव्हते.
मागील दोन आठवड्यांपूर्वी महापौर, उपमहापौर, सभापती आणि आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाचा संयुक्त आढावा घेत ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सभापती अनिल मकरिये यांनी वाढीव पाण्याद्वारे शहरातील गॅप कमी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान, सोमवारी सभापती मकरिये यांनी पुन्हा पाणीपुरवठा विभागाच्या कामाचा आढावा घेतला. त्यात त्यांनी वाढीव पाण्यामुळे काय परिणाम झाले, याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यावर संपूर्ण शहराला ७ व्या दिवशी पाणीपुरवठा करण्यास मदत मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.