छत्रपती संभाजीनगर : मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणीटंचाईचे संकटही अधिक गंभीर झाले आहे. नियमित स्त्रोत आटल्याने गावोगावी जाणवत आहे. त्यामुळे सध्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील १०१ गावे आणि २५ वाड्यांना १६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या सर्व गावांची लोकसंख्या ही ६ लाख ७५ हजार इतकी आहे. या सर्व टँकरच्या दररोज सरासरी ३३० खेपा होत आहेत.
सर्वाधिक टैंकर हे छत्रपती संभाजीनगर, गंगापूर आणि पैठण तालुक्यात सुरू आहेत. मराठवाड्यात दरवर्षीच उन्हाळ्यात कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. मात्र, गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने सर्व धरणे तुडुंब भरली होती.
परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी भासेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार, यंदा मार्च महिन्याअखेरपर्यंत पाणीटंचाईचे चटके बसले नाहीत. मात्र, एप्रिलपासून गावागावांमधील नियमित जलस्त्रोत आटले. त्यामुळे पाणीपुरवठा योजना बंद पडल्या.
परिणामी, अशा गावांना जिल्हा प्रशासनाकडून मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १०१ गावे आणि २५ वाड्यांना १६० टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. या टँकरच्या ३३० खेपा होत आहेत. उन्हाळी तीव्रता सतत वाढत असल्याने येत्या काही दिवसांत टँकरची ही संख्या आणखी वाढणार आहे.
११८ खासगी विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यातील अनेक गावांत सार्वजनिक विहिरींचे पाणी आटले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खासगी विहिरी अधिग्रहीत करून लोकांना पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ११८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यातील ५७ विहिरींवर टँकर भरले जात आहेत. तर उर्वरित विहिरींमधील पाणी नागरिकांना तेथून घेऊन जाण्यासाठी उपलब्ध आहे. या ११८ विहिरी या ११६ गावांमधील आहेत. वैजापूर आणि सिल्लोड तालुक्यांमध्ये प्रत्येकी २७विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.