Vijayadashami Dussehra : विजयादशमी निमित्ताने आज सीमोल्लंघन file photo
छत्रपती संभाजीनगर

Vijayadashami Dussehra : विजयादशमी निमित्ताने आज सीमोल्लंघन

शुभमुहूर्तावर खरेदीसाठी बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Vijayadashami Dussehra

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या भक्तिमय आराधनेनंतर मंगळवारी (दि. २०) मराठवाड्यात विजयादशमीचा सण अत्यंत उत्साहात - आणि आनंदात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने घरोघरी जय्यत तयारी करण्यात आली असून, आपट्याची पाने लुटण्यासाठी आणि सीमोल्लंघनासाठी नागरिकांची पावले चौकाचौकांकडे वळणार आहेत. विजयादशमी असल्याने अनेक नवीन गृहप्रवेश, वस्तुंची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते.

११ तारखेला घटस्थापना झाल्यानंतर गेले ९ दिवस नवरात्राचा उत्साह सर्वत्र संचारला होता. दुष्काळी परिस्थितीच्या छायेखाली नागरिकांनी सण साजरा केला. या काळात तुळजापूर, माहूर, अंबाजोगाई ही तीन स्थाने भाविकांनी गजबजली होती. याशिवाय गावागावात असणाऱ्या देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. नवरात्रात गरबा व अन्य सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सीमोल्लंघन झाल्यानंतर कोजारिपर्यंत देवी विश्रांती घेत असते.

विजयादशमी निमित्ताने दसरा मेळावे आणि रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नांदेड, हिंगोली, संभाजीनगर येथे रावण दहनाचे कार्यक्रम होतात. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात झेंडूच्या फुलांची प्रचंड मोठी आवक झाली आहे. त्यामुळे फुलांचे भावही गडगडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आणि ग्राहकांना स्वस्त दरात फुले उपलब्ध झाली असली, तरी ऐन सणात अपेक्षेप्रमाणे भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. असे असले तरी, दसऱ्याच्या या आनंदोत्सवाचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही.

भगवानगड, नारायणगड येथे आज मेळाव्यांचे आयोजन

गेल्या काही वर्षापासून भगवानगडाजवळ आणि नारायणगड येथे मेळाव्यांचे आयोजन केले जाते. भगवानगडाजवळ असणाऱ्या सावरगाव घाट भगवान भक्तिगड येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मेळावा होणार आहे. नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा असतो. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी संचलन काढले जाते. नागपुरात सरसंघचालकांचे मुख्य भाषण होत असते. याशिवाय उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे मेळावे मुंबईत होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT