sambhajinagar Valmik Karad Mocca Act Bench
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा मोक्का कायद्यांअंतर्गतच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यास नकार देणाऱ्या बीडच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध वाल्मीक बाबूराव कराड याने दाखल केलेल्या फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार सी. मोरे आणि न्या. मेहरोझ के. पठाण यांनी शासनास नोटीस बजावण्याचा आदेश दिला.
या अर्जावर १९ सप्टेंबर २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र खंडपीठात दाखल करण्याची मुभा खंडपीठाने अपीलार्थी कराड यास दिली आहे. बीड येथे दाखल विशेष मोक्का केसमधून वाल्मीक कराडचे नाव वगळण्यास बीडच्या विशेष न्यायालयाने नकार दिला होता.
सुनील शिंदे याला फोनवरून धमकी दिल्याबद्दल व त्यानंतर संतोष देशमुख याने खंडणीस विरोध केल्याच्या कंपनी परिसरातील घटनेवरून ६ डिसेंबर २०२४ रोजी गुन्हा क्रमांक ६३८/२०२४ दाखल झाला होता. या गुन्ह्यातून नाव वगळण्याबाबतचा कराडचा अर्ज विशेष न्यायालयाने २२ जुलै २०२५ ला नामंजूर केला होता. अपीलार्थीचे प्रथम माहिती अहवालात नाव नाही आदी मुद्द्द्यांवर कराडने अॅड. संकेत एस. कुलकर्णी आणि अॅड. सत्यव्रत जोशी यांच्यामार्फत खंडपीठात वरीलप्रमाणे अर्ज दाखल केला आहे.