Sambhajinagar Using AI to trick the police
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावर हडसपिंपळगाव शिवारात भरदिवसा उद्योजकाला लुटणाऱ्या परशुराम गायकवाड टोळीचा तपास एखाद्या थरारक बॉलिवूड चित्रपटालाही लाजवेल असा रंजक ठरत आहे. यूट्यूब, एआय आणि गुगलचा वापर करणारा, वारंवार गाडीच्या नंबर प्लेट बदलणारा आणि दिल्लीच्या पबमध्ये एका रात्रीत दीड लाख रुपये उडवणारा 'हायटेक' गुन्हेगार परशुराम पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
पण खरा थरार रंगला तो त्याचा मुख्य साथीदार असलेल्या मेव्हण्याला पकडताना "मी सापडलो तरी माझा मेव्हणा तुमच्या हाती लागणार नाही," अशी वल्गना करणाऱ्या परशुरामचा ओव्हरकॉन्फिडन्स पोलिसांनी चक्क शेतकऱ्यांचा 'देसी' जुगाड करून आणि उसाच्या फडातून मेव्हण्याला फरफटत बाहेर काढून जिरवला आहे. एलसीबीच्या या धडक कारवाईमुळे आठ जिल्ह्यांत 'मोस्ट वॉन्टेड' असलेल्या या टोळीतील अटक आरोपींची संख्या आता ७ वर पोहोचली आहे.
ज्ञानेश्वर शहादेव जाधव (३४, रा. मालेवाडी, ता. पाथर्डी ) आणि उमेश लक्ष्मण गायकवाड (२७, रा. पिठी नायगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. उजनी धरणाच्या (जि. पुणे) जलाशयालगतच्या तब्बल ८ एकर परिसरातील दाट ऊसफडात लपलेल्या या आरोपींना पकडण्यासाठी ग्रामीण पोलिसांना चक्क शेतकऱ्यांचा वेश धारण करावा लागला.
यापूर्वी पोलिसांनी परशुराम मोहन गायकवाड (२६, रा. एकनाथवाडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर, ह.मु. बीड), करण भरत जाधव (२२, रा. मिडसावंगी, ता. पाथर्डी, ह.मु. बीड), अनिल जयराम जाधव (रा. नाईकनगर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर). पंडित ऊर्फ चन्नाअप्पा सखाराम लष्करे (रा. सैनिक विद्यालय परिसर, बीड) आणि यापूर्वी अटक केलेला किरण अजिनाथ गायकवाड (२५, रा. हिवरसिंगा, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांना अटक केली आहे.
ज्ञानेश्वर जाधव हा। हा मुख्य सूत्रधार परशुरामचा सख्ख्खा मेव्हणा. परशुरामचे सर्व काळे धंदे तोच सांभाळायचा. दिल्लीत उपनिरीक्षक वैभव रणखांब, रवींद्र लोखंडे यांचे पथक परशुरामला पकडण्यासाठी गेले तेव्हा साध्या वेशातील कर्मचाऱ्यांना तेथील गर्मीत घाम आल्याचे पाहून त्याने हे पोलिसच असल्याचे ओळखले होते. मात्र, पथकाने त्याला उचलबांगडी करून बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हा परशुरामने पोलिसांना आव्हान दिले होते की, "ज्ञानेश्वर तुमच्या हाती लागणारच नाही." मात्र, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक भारत निकाळजे, सचिन राठोड, सुनील गोरे, संतोष डोंगरे, अनिल काळे, शिवाजी मगर यांच्या पथकाने हा फाजिल आत्मविश्वास फोल ठरवला.
अन् पोलिसांनी खांद्यावर घेतली शेतीची अवजारे
ज्ञानेश्वर आणि त्याचा साथीदार उमेश गायकवाड हे दोघे इंदापूरजवळील टोलनाक्यावर पोलिसांना दिसले. ज्ञानेश्वरची नजर पोलिसांच्या एमएच २० गाडीवर पडली आणि त्याला संशय आला. क्षणाचाही विलंब न लावता त्याने भरधाव वेगात दुचाकी वळवली आणि महामार्गावर थेट राँग साईडने उजनी धरणाच्या दिशेने पळ काढला. रस्त्या पाण्याजवळ संपल्याने दुचाकी टाकून बॅकवॉटरमधील दाट उसाच्या शेतीत लपून बसले. पावसाची संततधार आणि वन्यप्राण्यांचा धोका असतानाही पोलिसांनी हार मानली नाही. ओळख पटू नये म्हणून पोलिसांनी शेतकऱ्यांचा वेश परिधान केला, खांद्यावर शेतीची अवजारे घेतली आणि शेतात काम करत असल्याचा आभास निर्माण केला. बराच वेळ दबा धरून बसल्यानंतर, 'परिसरात फक्त शेतकरी आहेत' असे समजून बाहेर पडणाऱ्या ज्ञानेश्वर आणि उमेशवर पोलिसांनी अचानक झडप घातली-
परशुराम ८ जिल्ह्यांत 'मोस्ट वॉन्टेड'
परशुरामवर दरोडा, लूटमार, मारहाण आणि दहशत निर्माण करण्यासह गुटखा तस्करीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये बीडमध्ये ७, अहिल्यानगर आणि पुणे येथे प्रत्येकी ४, छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण प्रत्येकी २ आणि बुलढाणा, धाराशिव, नाशिक येथे प्रत्येकी १ असे एकूण २२ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. बीडमध्ये तब्बल १ कोटी रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्तीच्या प्रकरणात आरोपी होता. वाळूज येथे कारवाईसाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी थेट जीवघेणा हल्ला केला होता. वर्षभरापूर्वी बीडमध्ये वर्चस्वाच्या आणि दहशतीच्या वादातून दोन तरुणांना कारने उडविले होते.
नातेवाइकांच्या साथीने वाढवली टोळीची ताकद
परशुराम गायकवाड याचे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथवाडी (ता. पाथर्डी) हे आहे. मात्र, त्याने हळूहळू बीडमध्ये शिरकाव करून गुन्हेगारी विश्वात आपले बस्तान बसवले. सुरुवातीला बीड आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांत धुमाकूळ घातल्यानंतर त्याने आपल्या गुन्हेगारीचे जाळे विस्तारले. यासाठी त्याने स्वतःच्या नातेवाइकांना सोबत घेऊन टोळी मोठी केली. पाहता-पहाता त्याने छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धाराशिव आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आपले हातपाय पसरले-