Verul Ghat Tourists Inconvenience
वेरूळ : दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे ऐतिहासिक वेरूळ आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिरात भाविक व पर्यटकांचा अक्षरशः जनसागर लोटला आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वेरूळ परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. वेरूळ घाटात तब्बल दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा बुधवारी लागल्या होत्या. परिणामी वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा होऊन वाहनचालक आणि पर्यटकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी वेरूळ लेणी, जगप्रसिद्ध कैलास मंदिर आणि श्री घृष्णेश्वर मंदिराकडे मोठ्या संख्येने धाव घेतली आहे. एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्याने वेरूळ घाटातील अरुंद रस्ता आणि अवघड वळणांवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. अशा परिस्थितीत स्थानिक पोलिसांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
वेरूळ घाटातील वाहतूक कोंडीची समस्या पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेतली. त्यांच्या आदेशानुसार गुरुवारी (दि. १२) सकाळपासून ग्रामीण वाहतूक शाखेचे पाच पोलीस कर्मचारी वेरूळ घाट आणि मंदिर परिसरात तैनात करण्यात आले.
वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घाटातील अवघड वळणांवर प्रत्यक्ष उभे राहून वाहनांचे नियोजन केले. वाहनचालकांना योग्य दिशा देत वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली. पोलिसांच्या या तत्पर नियोजनामुळे गुरुवारी वाहतूक सुरळीत सुरू राहिली. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या भाविक आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला.
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता वेरूळ घाटात वाहतूक पोलिसांची उपस्थिती कायम ठेवणे आवश्यक असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन तातडीने कार्यवाही केल्याबद्दल पोलिसांच्या भूमिकेचे ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे