छत्रपती संभाजीनगर : शहरात मंगळवारी (दि. १३) दुपारी अवघ्या काही तासांच्या अंतराने तीन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या तीन घटना घडल्या. अत्यंत गजबजलेल्या कॅनॉट प्लेस परिसरातील कॅफे, सेव्हनहिल जवळील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमधील एसी आणि जुना मोंढा नाका भागात या आगीच्या घटना घडल्या. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत तिन्ही ठिकाणची आग आटोक्यात आणली. विशेषतः कॅनॉट प्लेसमधील कॅफेमध्ये लागलेल्या आगीदरम्यान आत असलेले तीन सिलिंडर जवानांनी धाडसाने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ आणि संभाव्य स्फोट टळला.
कॅनॉट प्लेसमध्ये कॅफेला आग
कॅनॉट प्लेस या अत्यंत गजबजलेल्या भागात दुपारी ३.४७ वाजेच्या सुमारास कॅफे फूड मार्वलमध्ये शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन केंद्राचा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. कॅफेमध्ये तीन गॅस सिलिंडर असल्याचे लक्षात येताच जवानांनी तातडीने सुरक्षितरीत्या ते बाहेर काढले. सिलिंडरचा स्फोट झाला असता तर संपूर्ण मार्केट परिसरात मोठी दुर्घटना घडली असती, मात्र जवानांच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली.
'एसी'च्या शॉर्टसर्किटमुळे भडका
सायंकाळी पावणेसहा वाजेच्या (५.४५) सुमारास यशोदीप हॉटेलजवळील पेंग्विन अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरील बजाज यांच्या फ्लॅटमध्ये एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग भडकली. घरातून धुराचे लोट निघत असल्याचे दिसताच इमारतीतील नागरिकांमध्ये घबराट पसरली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
खोबऱ्याच्या टेम्पोला आग
तत्पूर्वी, दुपारी २.१९ वाजेच्या सुमारास जुना मोंढा नाका परिसरात एका खोबऱ्याने भरलेल्या टेम्पोला अचानक आग लागली. सिडको आणि पदमपुरा अशा दोन्ही अग्निशमन केंद्रांमधून अग्निशामक बंब रवाना करण्यात आले. जवानांनी पाण्याच्या सहाय्याने आग पूर्णपणे विझवली.
टेम्पोची कॅबिन पूर्णपणे जळून खाक झाली. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक एन. खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, उप अग्निशमन केंद्र अधिकारी संजय कुलकर्णी, ड्युटी अधिकारी चेतन तरोळे, अशोक वेलदोडे, अब्दुल वासे, अमीर शेख, माधव गाडे, बाबासाहेब मुंगले यांच्या पथकाने तिन्ही घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याची कामगिरी बजावली.