sambhajinagar The thieves stole a 13-gram necklace from the cupboard in the house
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरातील कपाटातून अज्ञात चोरट्याने १३ ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस लंपास केला. ही घटना २२ डिसेंबर ते १३ जा-नेवारी या काळात ब्ल्यू बेल अपार्टमेंट, न्यू उस्मानपुरा भागात घडली.
फिर्यादी विजयकुमार बबनराव शाहीर (६२, रा. न्यू उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार, शाहीर हे त्यांच्या पत्नीसह राहतात. ५ जानेवारी रोजी त्यांच्या मुलाने फोन करून संक्रांतीच्या सणासाठी नेकलेस हवा असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्या पत्नीने घरातील लाकडी कपाटाच्या ड्रॉवरमध्ये नेकलेस शोधला असता तो दिसून आला नाही. कुटुंबीयांनी सुरुवातीला घरामध्ये सर्वत्र शोध घेतला, मात्र दागिना मिळाला नाही.
दागिना बँकेच्या लॉकरमध्ये ठेवला असावा, या शक्येतेने त्यांनी १३ जानेवारी रोजी बँकेत जाऊन तपासणी केली, परंतु तिथेही नेकलेस मिळून आला नाही. २२ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ यादरम्यान घराच्या कपाटातून हा दागिना चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
मोलकरणीच्या पतीने दिली धमकी
शाहीर यांच्याकडे १ डिसेंबर २०२५ पासून एक महिला घरकामासाठी येत होती. नेकलेसबाबत तिला विचारले असता तिने दागिना घेतला नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिचा पती घरी आला आणि त्याने माझ्या पत्नीवर चोरीचा संशय घेतल्यास तुमच्यावर उलट तक्रार करेन, अशी धमकी दिली. सोन्याचा नेकलेस कोणी चोरला हे प्रत्यक्ष पाहिले नसल्याने शाहीर यांनी अखेर मंगळवारी (दि.३) उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास जगताप करत आहेत.