

A jeweler's shop burnt down in Mukundwadi
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने दुकान बंद करून अंत्यविधीसाठी गेलेल्या सराफ्याच्या दुकानाला भीषण आग आग लागली. ही घटना गुरुवारी (दि.५) दुपारी साडेचार वाजच्या सुमारास मुकुंदवाडी गावात घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत तासाभरात आग आटोक्यात आणली. सुदैवाने दुकान बंद असल्याने जीवितहानी झाली नाही.
अधिक माहितीनुसार, बुऱ्हऱ्हाडे यांचे मुकुंदवाडी गावात श्री समर्थ ज्वेलर्स नावाने दुकान आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे नव्याने बसविले होते. दरम्यान, दुपारी नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून गेले होते.
त्यानंतर तासाभरातच दुकानातून धुराचे लोळ शहरमधून बाहेर पडत असल्याचे आजूबाजूच्या नागरिकांच्या निदर्शनास आले. अग्निशमन दलाला कळविण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी अशोक खांडेकर यांच्या मार्गदर्शनात सिडको येथून उप अग्निशमन केंद्र अधिकारी विजय राठोड, विनायक कदम, ड्युटी अधिकारी चेतन तरोळे
सोमीनाथ भोसले जवान अशोक वेलदवडे, विशाल निंबाळकर, माधव गाडे, किरण शेलार, नंदकुमार आरक, राजू राठोड, कृष्णा भागवत, चालक दुबेले, अंबाडे यांनी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. मात्र, बहऱ्हाडे यांच्या दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने त्यांची मोठी वित्तहानी झाली आहे.