sambhajinagar Supriya Sule Pensioner
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी सोमवारी (दि.१९) छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कांचनवाडी येथे आल्या होत्या. त्यावेळी ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीने त्यांची भेट देऊन गेल्या दहा वर्षांपासून पेंशनवाढीसाठी लढा सुरू आहे. त्याला यश मिळाले नाही. लढा करून थकलेल्या पेंशनधारकांनी ताई आमची शेवटची दिवाळी तरी गोड करा अशी आर्त हाक दिली.
है निवेदन देताना पेन्शनधारकांच्या डोळ्यात अश्रू होते. संघटनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष कमलाकर पांगारकर यांनी ताईंना भावनिक साद घातली. ताई, तुम्ही आमचा प्रश्न पोटतिडकीने मांडला. त्याबद्दल ऋण व्यक्त करत, आता पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमचा हा १० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावा.
अशी गळ घातली. या संवादाला प्रतिसाद देताना सुळेही भावुक झाल्या आणि त्यांनी सर्व वृद्ध पेन्शनधारकांना आश्वस्त केले. याप्रसंगी समितीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, अरुण कुलकर्णी, आशा शेळके, गोरक्ष शेळके, मधुकर सोनार, यांच्यासह जिल्ह्यातील पेन्शनधारक, महिला-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.