Sambhajinagar smart meter issue AI Image
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar smart meter issue : स्मार्ट मीटर बसवूनही ग्राहकांच्या नशिबी अव्हेटेज बिलांचा शाॅक

महावितरणचे अचूक बिलांचे दावे फोल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महावितरणकडून 'स्मार्ट मीटर'द्वारे अचूक बिलांचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र स्मार्ट मीटर बसवूनही ग्राहकांच्या नशिबी 'अव्हेरेज' बिलांचा शॉकच येत असल्याचे चित्र आहे. पडेगावच्या एका ग्राहकाला शून्य वीज वापर असूनही वर्षभरापासून अवव्हेरेज बिल दिले जात असल्याने महावितरणचे अचूक बिलांचे दावे फोल ठरल्याचे उघड झाले आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्राहकांना अचूक बिलिंग मिळणार आणि वीज वापर 'पॉइंट टू पॉइंट' कळणार, असे दावे महावितरणकडून करण्यात येत होते. मात्र पडेगाव येथील सप्तशृंगीनगरातील विठ्ठल दरेकर या ग्राहकाला जून २०२५ पासून 'अव्हेरेज' (सरासरी) बिल देण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांपासून त्यांच्या घरात विजेचा कोणताही वापर नसूनही त्यांना सरासरी बिल पाठवले जात आहे. या संदर्भात बिलाची दुरुस्ती करण्यासाठी ते छावणी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारून थकले आहेत. मात्र "आधी बिल भरा, नंतर पाहू," अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने त्यांची 'महावितरण वारी' अद्यापही सुरूच आहे.

अनेक ग्राहक त्रस्त, हैराण

स्मार्ट मीटरच्या तक्रारी नसल्याचा दावा महावितरण वेळोवेळी करत आहे, परंतु प्रत्येक सबस्टेशनमध्ये विविध अडचणी घेऊन ग्राहक येत आहेत. स्मार्ट मीटर लावल्यानंतरही ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. ज्यांचा नियमित वापर २०० युनिटच्या आसपास आहे, त्यांना एकाच महिन्याचे ७०० ते ३००० युनिट्सपेक्षाही जास्त बिल देण्यात आले आहे. तर काही ग्राहकांच्या मीटरचे आकडेच दिसत नाहीत, मात्र त्यांना बिल नियमित येत आहे. या वाढत्या तक्रारींमुळे ग्राहक हैराण झाले असून, त्यांना आपली सर्व कामे सोडून महावितरण कार्यालयात खेट्या माराव्या लागत आहेत.

अधिकाऱ्यांची ठरलेली उत्तरे

वर्षानुवर्षे मर्यादित वीज वापरणाऱ्या ग्राहकांना अचानक वाढीव बिल आल्याने ते चौकशीसाठी कार्यालयात जातात. तेव्हा, "तुमचा वापर वाढला असेल, म्हणून बिल जास्त आले, बिल बरोबर आहे," असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. तर काहींना "अर्ज करा, दुरुस्ती करून दुसरे बिल देऊ," अशी नेहमीचीच उत्तरे दिली जात आहेत. यामुळे अनेक ग्राहक त्रस्त झाले असून, स्मार्ट मीटरमुळे अचूक बिलिंग होऊन ग्राहकांचा त्रास वाचेल हा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT