Crime file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | भावानेच केला भावाचा खून; अपघाताचा बनाव पोलिस तपासात उघड

सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील धक्कादायक घटना : तांत्रिक विश्लेषण व साक्षीदारांच्या जबाबातून सत्य समोर

पुढारी वृत्तसेवा

Sillod Mangrul brother kills brother

सिल्लोड : तालुक्यातील मंगरूळ येथे मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आलेल्या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी पोलीस नाईक सतीश नाना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अतुल बालाजी खेळवणे (रा. मंगरूळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शुभम बालाजी खेळवणे (वय ३०) याचा मृत्यू १० मे २०२६ रोजी झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड येथून एम.एल.सी.द्वारे पोलिसांना प्राप्त झाली होती. सुरुवातीला मोटारसायकलवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

पोलीस नाईक सतीश पाटील यांनी पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर सपोनि रविंद्र ठाकरे, पोउपनि लहू घोडे, पोहेकॉ संजय ए.आगे, तसेच पोलिस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मोटारसायकल क्रमांक एमएच २० जीएल ०७२० ची तपासणी केली असता अपघात झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळून आले नाहीत. यानंतर मृताचा भाऊ अतुल खेळवणे व आप्पासाहेब खेळवणे यांची चौकशी करण्यात आली असता त्यांच्या जबाबांमध्ये विसंगती दिसून आली.

तांत्रिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब आणि तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीवरून आरोपी अतुल बालाजी खेळवणे याने गावातील व्यक्तीस शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून सख्खा भाऊ शुभम यास चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कॉलर व गळा पकडून खाली आपटत गंभीर दुखापत करून त्याचा खून केला. तसेच हा गुन्हा लपवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व पोलिसांना खोटी माहिती देत अपघाताचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी आरोपी अतुल बालाजी खेळवणे यास अटक करण्यात आली असून त्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, सिल्लोड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र ठाकरे, पोउपनि लहू घोडे, संजय ए.आगे, सचिन ई. काळे, राजेंद्र के.काकडे व पोलीस नाईक सतीश पाटील यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र ठाकरे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT