छत्रपती संभाजीनगर : जुन्या शहरातील वाहतूक कोंडीचा मुख्य अडथळा ठरलेल्या रोशन गेट ते चंपा चौक या प्रमुख मार्गावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिका प्रशासनाने शनिवारी (दि. १७) धडक कारवाई केली. सकाळी साडेअकराच्या सुमारास सुरू झालेल्या या मोहिमेत सुमारे ४५० ते ४६० कच्च्या-पक्क्या बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला.
रस्त्याच्या हद्दीत आलेली दुकानांची ओटे, शेड आणि घरांचे वाढीव भाग हटवण्यात आल्याने तब्बल १५ मीटर रुंदीचा रस्ता पूर्णपणे मोकळा झाला आहे. यामुळे या परिसरातील नित्याची वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होणार असून, स्मार्ट सिटीअंतर्गत प्रलंबित राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
रोशन गेट ते चंपा चौक या मार्गावर अनेक दुकानदार व रहिवाशांनी रस्त्याच्या हद्दीपर्यंत अतिक्रमणे केल्यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत होती. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने रोशन गेट परिसरातून या कारवाईला सुरुवात केली. कारवाईपूर्वी शुक्रवारी रात्रीच अनेक व्यावसायिक आणि रहिवाशांनी स्वतःहून वाढीव बांधकामे काढून घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, शिल्लक राहिलेली अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने यंत्रसामग्रीचा वापर केला.
एका डेअरीवरील कारवाईदरम्यान काही नागरिकांनी आक्षेप घेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला; मात्र अधिकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करण्याचा सज्जड इशारा दिल्यानंतर विरोध मावळला आणि तणाव निवळला शारदीय नवरात्रोत्सवामुळे पोलिसांचा ताफा इतरत्र तैनात असल्याने या मोहिमेसाठी पोलिस बंदोबस्त मिळू शकला नाही. मात्र, प्रशासनाने कच न खाता 'नागरी मित्र' पथकातील २० जवानांसह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तैनात करून नियोजनबद्ध कारवाई केली.
या मोहिमेत ६ जेसीबी, २ टिप्पर, १ हुकलोडर आणि २ विद्युत वाहनांचा वापर करण्यात आला. ही कारवाई उपायुक्त सविता सोनवणे, सहायक आयुक्त रफिक शेख, रमेश मोरे, लता भांडवले, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई व प्रमोद जाधव यांच्या उपस्थितीत पार पडली.
स्मार्ट सिटीच्या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते; परंतु दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांमुळे फुटपाथ, पेव्हर ब्लॉक बसवणे आणि ड्रेनेज लाईनचे काम रखडले होते. कंत्राटदाराच्या वारंवार तक्रारीनंतरही कारवाई होत नव्हती. आता रस्ता मोकळा झाल्याने उर्वरित पायाभूत कामे गतीने पूर्ण होतील , तसेच रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगलाही आळा बसेल.
नागरिकांना आधीच सूचना देऊन अतिक्रमणे काढण्याची संधी देण्यात आली होती. या मोहिमेनंतर आता सोमवारी तीन स्वतंत्र पथकांद्वारे चंपा चौक ते जिन्सी आणि चंपा चौक ते कटकट गेट या मार्गावरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला जाणार असल्याचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.
शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याचे स्पष्ट आदेश आहेत. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करावे. कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल केले जातील.समीर राजूरकर, महापौर
अतिक्रमणांमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्ता रुंद व स्वच्छ झाल्याने वाहतूक सुरळीत होईल. यामुळे परिसरातील बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढून स्थानिक व्यापाऱ्यांचाही व्यवसाय वाढेल.सय्यद उसामा, नगरसेवक