sambhajinagar Road bad condition Ganeshotsav
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू होणार असून, येत्या काही दिवसांत गणेशाचे आगमन होणार आहे. मात्र रस्त्यावरील खड्यांचे गणरायाच्या आगमनाला नमन असणार आहे. पावसामुळे अनेक ठिकाणच्या सिमेंट रस्त्यांवरही खड्डे पडले असून, काही ठिकाणी तर पाण्याची तळी साचल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शहरातील रस्त्यांची सलगच्या पावसामुळे बिकट अवस्था झाली असून, यंदा गणरायाचे आगमनही खड्ड्यांतूनच होणार आहे, महापालिकेकडून कोट्यवधी रुपयांची कामे करून दर्जेदार सिमेंट रस्ते उभारल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र शहरातील दिल्लीगेट, जुना मोंढा, सिडको, मुकुंदवाडी, हडको, जालना रोड, उस्मानपुरासह विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडले आहेत.
तसेच काही ठिकाणच्या सिमेंट रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्याने तळी निर्माण झाली आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून, दुचाकीस्वार घसरून पडण्याची शक्यता आहे. दरम्यान शहरात सर्वत्र गणेशत्सोवाची धूम आहे. मात्र शहरातील रस्त्यांवरील खड्यांमुळे गणेश ोत्सवासाठी मंडळांना मंडप उभारणी व मूर्ती आणण्यासाठी या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मंडळांना ही कामे करताना मोठी कसरत करावी लागत आहे.
दरवर्षी खड्डेमुक्त शहर मोहिमेची घोषणा करूनही वास्तव वेगळेच आहे. काही ठिकाणच्या रस्त्यांची थातुर मातुर डागडुजी करत खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. त्यामुळे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी होत आहे. त्यामुळे मनपाबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
छावणीतील लोखंडी पुल अरुंद असून, या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वारंवार वाहनांच्या रांगा लागत आहे. या खड्यांकडे बांधकाम विभाग, महापालिका आणि छावणी परिषदेकडूनही दुर्लक्ष करण्यात येत होते. त्यामुळे कर्तव्यावरील वाहतूक पोलिसांनी सोमवारी माती टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि व्यावसायिकांना वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तात्पुरत्या डागडुजीऐवजी रस्त्यांची संपूर्ण दुरुस्ती करण्यात यावी. कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करून दर्जेदार कामे करावीत. तसेच गणेशोत्सवाचे स्वागत उत्साहाने व्हावे, रस्त्यांवरील खड्डे आणि तळी यामुळे या उत्साहावर विरजण पडू नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.