Sambhajinagar Rain News : Rain havoc in the district; 3 people killed, 9 livestock killed
छत्रपती संभजीनगर, पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या मान्सूनने जिल्ह्यात उशिरा हजेरी लावली असली तरी मध्यंतरी झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले आहे. १ जूनपासून झालेल्या पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यात वीज पडणे, पाण्यात वाहून जाणे आदी घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण जखमी झाला आहे. तसेच नऊ पशुधन दगावले असून, ११० कच्च्या घरांची अंशतः पडझड झाली आहे. विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२४.१ मिमी पावसाची नोंद झाली असून, ती जिल्ह्याच्या १३९.९ मिमी सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र दोन ते तीन दिवस झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे जलसाठ्यांना दिलासा मिळाला असला तरी मनुष्यहानी आणि मालमत्तेचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. अहवालानुसार, जिल्ह्यात सहा मोठी व एक लहान दुधाळ जनावरे तसेच ओढकाम करणारी दोन मोठी जनावरे दगावली आहेत.
याशिवाय एका गोठ्याचेही नुकसान झाले आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत, तर मृत पशुधनासाठी चार हजार ते ३७ हजार ५०० रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याची शासनाची तरतूद आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून, ते पूर्ण होताच शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर बाधितांना आर्थिक मदत वितरित केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मराठवाड्यात आठ जणांचा बळी
१ जूनपासून झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील तीन, परभणीतील दोन आणि नांदेडमधील तीन जणांचा समावेश आहे. तसेच विभागात विविध प्रकारच्या एकूण १८१ पशुधनांचा मृत्यू झाल्याची नोंद विभागीय अहवालात करण्यात आली आहे.