Sambhajinagar Rain: District receives 89.5% of average rainfall
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात मान्सूनची प्रगती संथ असली तरी काही तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. २ जुलैअखेर जिल्ह्यात १ जूनपासून एकूण १२०.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, तो सरासरीच्या ८९.५ टक्के आहे. जून महिन्यात जिल्ह्यात १०७.९ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या ८६.२ टक्के आहे.
तालुकानिहाय पाहता वैजापूरमध्ये सर्वाधिक ११४.३ टक्के, तर फुलंब्रीमध्ये १०३.७ टक्के पाऊस झाला आहे. सोयगाव (९८.१ टक्के), सिल्लोड (९४.६ टक्के), गंगापूर (९३.७ टक्के) आणि पैठण (९१.६ टक्के) येथेही पावसाची स्थिती समाधानकारक आहे. दुसरीकडे खुलताबाद (७०.२ टक्के), कन्नड (७५.६ टक्के) आणि छत्रपती संभाजीनगर तालुका (८१ टक्के) येथे सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
गेल्या २४ तासांत खुलताबाद तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल फुलंब्रीमध्ये १९.९ मिमी, कन्नडमध्ये १७.१ मिमी, सिल्लोडमध्ये १६.५ मिमी, छत्रपती संभाजीनगर तालुक्यात १५.६ मिमी, वैजापूरमध्ये १० मिमी, गंगापूरमध्ये ९.१ मिमी, सोयगावमध्ये ८.७ मिमी आणि पैठणमध्ये ३.४ मिमी पावसाची नोंद झाली.