छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारीचे केंद्रबिंदू बनत चाललेल्या पुंडलिकनगर भागात पुन्हा एकदा राडा झाला आहे. शुक्रवारी (दि. २४) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने थेट शिवसेना (शिंदे गट) उपविभागप्रमुख विकास नरवडे आणि त्यांच्या कुटुंबीयावरच चाकूने जीवघेणा हल्ला केला.
या रक्तरंजित हल्ल्यात नरवडे यांच्या गालापासून ते मानेपर्यंत गंभीर वार झाले असून, त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेनंतर संतप्त जमावाने रस्त्यावर मोठी गर्दी केल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेजारील वादातून उडाला भडका
प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोर निलंबित पोलिस कर्मचारी आणि जखमी नरवडे हे एकमेकांच्या शेजारीच वास्तव्यास आहेत. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून सातत्याने खटके उडत होते. यापूर्वीही त्यांच्यात बाचाबाची झाली होती. शुक्रवारी रात्री याच धुमसणाऱ्या वादातून पुन्हा ठिणगी पडली.
...आणि सपासप वार सुरू झाले
रात्री दोन्ही गटांत शिवीगाळ सुरू असताना संतापलेल्या निलंबित कर्मचाऱ्याने आपल्या काही साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. रागाच्या भरात नरवडे यांना कायमचे संपवण्याची भाषा करत त्याने थेट चाकू काढला आणि त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात विकास नरवडे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या घरातील इतर तीन सदस्यांनाही दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
शिवसैनिकांचा चौकात ठिय्या
घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी आणि कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा पुंडलिकनगर चौकात धाव घेत ठिय्या दिला. एका पोलिस कर्मचाऱ्याकडूनच सामान्य नागरिकांवर चाकू उगारला जाणे ही अत्यंत संतापजनक आणि गंभीर बाब असल्याचे राजेंद्र जंजाळ यांनी म्हटले आहे. याप्रकरणी संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आपण पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेणार असल्याचे जंजाळ म्हणाले. घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.