Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत चालणार कार्यक्रम : पालकमंत्री file photo
छत्रपती संभाजीनगर

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवात शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत चालणार कार्यक्रम : पालकमंत्री

यंदाही डीजेमुक्त उत्सव ! पारंपरिक वाद्यांच्या वापराचा समन्वय समितीत निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar Programs will continue till midnight on the last five days of Ganeshotsav: Guardian Minister

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. ६) पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यावर्षी गणेशोत्सवाचे शेवटचे पाच दिवस रात्री १२ वाजेपर्यंत कार्यक्रम सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केली. तसेच, गतवर्षीप्रमाणे यंदाही शहर आणि जिल्ह्यात 'डीजे बंदी' कायम राहणार असून, उत्सवात पारंपरिक वाद्यांचा (ढोल-ताशे, झांज) वापर करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

एमआयटीच्या मंथन हॉल (बीड बायपास) येथे आयोजित या बैठकीला पालकमंत्री संजय शिरसाट, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, पंकज अतुलकर, रत्नाकर नवले, मनपा अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी विधाते, महावितरणचे अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांच्यासह विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.

डीजेच्या मुद्द्यावर पालकमंत्री शिरसाट यांनी अतिशय कडक भूमिका मांडली. डीजेचा दणदणाट आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, कानाचे पडदे फाटतात. वयोवृद्ध आणि लहान मुलांना नाहक त्रास होतो. डीजे पाहिजे म्हणणाऱ्याला ५ मिनिटे साऊंडच्या बाजूला बसवले, तर त्याला दुसऱ्या दिवशी ऐकूही येणार नाही, असा टोला लगावत शिरसाट म्हणाले की, लोकांच्या आयुष्याशी खेळू नका. सण दणक्यात साजरा करा, पण पारंपरिक वाद्यांचा वापर करा. डीजेला आमचा पूर्ण विरोध आहे.

पोलिस आयुक्तांनी कारवाई करावी, आमचा पूर्ण पाठिंबा राहील. मिरवणुकीतील नंबरच्या वादावर तोडगा काढताना, मिरवणूक मार्गात प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य द्या, अशी सूचनाही शिरसाट यांनी केली. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. सार्वजनिक गणेश मंडळांना त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे प्रात्यक्षिक आणि सादरीकरण करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीपासून 'ड्राय डे' ठेवण्याची मागणी केली. तर माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत. महाप्रसादासाठी 'एफडीए'च्या कडक अटी नसाव्यात. हुल्लडबाजी करणाऱ्या नशेखोरांना १५ दिवस आतच टाकावे अशी मागणी केली. महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना पिंपळे यांनी स्वच्छता, रस्ते, विसर्जनस्थळे तसेच अन्य नागरी सुविधांबाबत महानगरपालिकेने केलेल्या तयारीची माहिती दिली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव काळात सुरक्षित व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. बैठकीला मंडळाचे नंदकुमार घोडेले, अशोक सायन्ना, बबन डिडोरे, बबन गायकवाडसह आदींची उपस्थिती होती-

डीजे चालकांवर गुन्हे दाखल करणार : पोलिस आयुक्त

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी डीजे आणि हुल्लडबाजांवर थेट कारवाईचा इशारा दिला. "गेल्या वर्षी अहिल्यानगर, श्रीरामपूर येथून आलेल्या डीजेच्या वाहनांवर आम्ही ५-५ लाखांचा दंड आकारला होता. यंदाही नाकेबंदी करून कारवाई केली जाणार आहे. शहरातही काही जणांनी डीजेची वाहने तयार ठेवली आहेत, त्यांची यादी माझ्याकडे आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आयुक्त म्हणाले. गुन्हेगारांवर वचक बसवण्याबाबत बोलताना आयुक्त म्हणाले, "गेल्या १० वर्षांत झाली नाही, एवढी नार्कोटिक्सची कारवाई आम्ही केली. २५० गुन्हेगारांना जेलमध्ये टाकले आहे. पावसाळा संपल्यावर या आरोपींची घरे पाडण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसेच, अवैध दारू पुरवठा करणाऱ्या ९ वाईन शॉप्सचे परवाने रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला असून ते कधी कारवाई करतात याची मी वाट पाहतोय असेही त्यांनी सांगितले

डीजेच्या मुद्द्यावरून तरुण बैठकीतून पडले बाहेर

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीजे संदर्भात बोलताना डेसिबल किती ठेवावा या भानगडीत न पडता डीजे नाही म्हणजे नाही असे सांगताच बैठकीतून काही तरुण उठून बाहेर पडले. कार्यक्रमानंतर बाहेर तरुणांनी पोलिस आयुक्तांची भेट घेत साऊंड सिस्टीमला परवानगी द्यावी अशी मागणी केली. त्यावर आयुक्तांनी दोन टॉप, दोन बेस याची परवानगी आपण देतच आहोत असे स्पष्ट केल्याने तरुणांचा संभ्रम दूर झाला. त्यांनी समाधान व्यक्त केले.

समन्वय बैठकीत रंगले नाट्य; नेत्यांची दांडी, गणेश महासंघाचा बहिष्कार

गणेशोत्सवाच्या महत्त्वाच्या समन्वय बैठकीबाबत लोकप्रतिनिधींनी मात्र उदासीनता दाखवली. निमंत्रण पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, विधानपरिषदेचे मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, रमेश बोरनारे, महापौर समीर राजूरकर, जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार कल्याण काळे, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जैस्वाल, सतीश चव्हाण, प्रशांत बंब, सुहास सिरसाठ, अनुराधा चव्हाण, उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नावांचा समावेश होता. मात्र, बैठकीला केवळ पालकमंत्री शिरसाट आणि उपमहापौर जंजाळ हे दोनच नेते उपस्थित राहिले. त्यातही पालकमंत्री चक्क दोन तास उशिरा पोहोचले. तर दुसरीकडे, निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने आणि रीतसर न बोलावल्याचा आरोप करत गणेश महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या बैठकीवर थेट बहिष्कार टाकला. पोलिस आयुक्तांनी स्वतः फोन करून बोलावल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, या बहिष्काराची आणि नेत्यांच्या दांडीची शहरात मोठी चर्चा सुरू आहे.

पदाधिकारी आणि नागरिकांच्या प्रमुख मागण्या व सूचना

राजीव थिटे यांनी बीड बायपास भागातील खदानीत होणाऱ्या विसर्जनाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. तर पदमपुरा येथील गणेश मंडळाचे जयदीप वानोरे यांनी विसर्जन मिरवणुकीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी केली. सुवर्णा मोहिते यांनी डीजेला स्पष्ट विरोध केला. जर कोणी डीजे वाजवला, तर पोलिस ठाण्यात फिर्यादी होण्यास आम्ही तयार आहोत असे सांगितले. एकाने राजीव गांधी मैदान नशेखोरांचा अड्डा बनला असून कारवाईची मागणी केली. यासोबत अनेकांनी जलवाहिनीच्या कामांमुळे रस्त्यावर झालेले खड्डे तात्काळ बुजविण्याचे सूचना केल्या. तर काहींनी रस्त्यावर लोंबणाऱ्या वीज तारा, केबल तात्काळ हटवा असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT