Sambhajinagar Pramod Padaswan murder case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा पोलिसांकडे ३० वेळा तक्रारी करूनही कारवाई न केल्यानेच निमोणे कुटुंबाची मजल थेट खुनापर्यंत गेली. जागेच्या वादातून प्रमोद पाडसवान यांची निर्धूण हत्या झाल्यानंतर आता कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय नेत्यांची रीघ लागली आहे. रविवारी (दि.२४) पालकमंत्री संजय शिरसाट, विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, आ. संजय केणेकर, माजी खा. चंद्रकांत खैरे, माजी खा. इम्तियाज जलील यांनी भेट घेतली. त्यावेळी पाडसवान कुटुंबाने निमोणेच्या दहशतीची आपबिती कथन केली.
निमोणे कुटुंबाला एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीचा राजकीय पाठिंबा होता. सोशल मीडियावर त्याच्यासोबतच अनेक व्हिडिओ आहेत. पडसवान कुटुंबीय म्हणाले की, निमोणेचे एक व्याही नेते असून, तू आमचे काहीच करू शकत नाहीस, अशी धमकी देत होते. तसेच एक माजी नगरसेवक आणि गणेश मंडळाचा अध्यक्षही त्यांना पाठबळ द्यायचे. त्या जोरावरच निमोणे दहशत करत होते. ? आरोपींकडे पैसा, पॉवर आणि सत्ता आहे. त्यामुळे ते सहा महिन्यांत सुटून येतील आणि त्यांना मारतील. त्यापेक्षा आपण विष घेऊन मरणे चांगले, असे जलील यांच्यासमोर पडसावान कुटुंबीय म्हणाले. यावर इम्तियाज जलील यांनी हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे आणि दोषी पोलिस जगताप याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली.
हॉस्पिटलमध्ये येऊन कोण वाचले? कोण मेले? आरोपींकडून चौकशी मृत प्रमोद यांचा मुलगा ? रूद्रने सांगितले की, ज्या जागेवरून हा वाद सुरू आहे, तिथे आरोपींनी पहिला ठोका असे लिहिलेले बॅनर लावले होते. या माध्यमातून ते आपल्याला मारण्याचा संदेश देत होते. हल्ल्यानंतर जेव्हा रूद्र आणि त्याचे वडील आयसीयूमध्ये उपचार घेत होते, तेव्हा आरोपी तिथे येऊन कोण वाचले, कोण मेले अशी चौकशी करत होते. रूद्रचा आवाज ऐकल्यावर हा कसा वाचला, असे आरोपी म्हणाले. आरोपींकडे दोन बंदुका होत्या, त्या कमरेला लावून ते फिरत होते, असेही रूद्रने सांगितले. तसेच, रूद्रने पोलिसांकडून संरक्षणाची आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आरोपी निमोणे हे वाढदिवसाच्या दिवशी तलवारी चाकू हवेत फिरवायचे, या हत्याकांडानंतर त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या सर्व पोस्ट डिलिट केल्या, असेही रुद्राने सांगितले.
मंदाबाई म्हणाल्या, त्या दिवशी आम्ही पोलिस ठाण्यात गेलो. आम्ही सांगूनही पोलिस आले नाही. पोलिस निरीक्षक वाघमारे 1 समोरच उभे होते, आम्ही तुमच्याकडे आलो तरी तुम्ही आलाच नाही हो ना साहेब, खरंय ना? असे त्या म्हणाल्या. जगताप नावाचे एक पोलिस म्हणाले की, तक्रार द्यायला वारंवार काय येतोस? जा, मारामारी कर ! तुझी हिंमत नाही का? मर्डर हाफ मर्डर करून माझ्याकडे ये, असे म्हणाल्याचा आरोप पालकमंत्र्यांसमोरच केला.
दरम्यान, परिसरातील लोकांनी पालकमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, निमोणे 2 कुटुंबीयांकडून सर्वांना त्रास होत आहे. त्यांना फाशी द्या! त्यांना या परिसरात राहू देऊ नका. त्यांच्या घरावर बुलडोझर चालवा, अशी मागणी परिसरातील महिलांनी यावेळी पालकमंत्र्यांकडे केली.
माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यांसमोर मारले. ते नराधम सुटून येतील आणि आम्हालाही मारतील. साहेब, आम्हाला वाचवा! अशी आर्त हाक मृत प्रमोद यांच्या पत्नीने देत आक्रोश केला, रात्री उशिरापर्यंत होल वाजवून ते आम्हाला त्रास द्यायचे. याआधीही त्यांनी आम्हाला अनेकदा मारहाण केली आहे. आम्ही अनेक तक्रारी केल्या, मात्र आमची एकही तक्रार नोंदवली गेली नाही. त्यामुळेच आज माझ्या डोळ्यांसमोर माझ्या नवऱ्याला मारण्यात आले. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी नेतेमंडळीसमोर केली.
» पालकमंत्री जाताच गव्हाड नावाच्या व्यक्तीने पाडसवान कुटुंबीयांना रविवारी दमदाटी केली. माझे नाव का घेतले? असे म्हणत गोंधळ घातला. तिथे मोठ्याप्रमाणात नागरिक जमलेले असल्याने गोंधळ आणखीनच वाढला. पोलिसांनी जमावाला पांगविले. त्यानंतर पोलिस गव्हाडला दुचाकीवर बसवून घेऊन गेले. त्याने नातेवाईक महिलेच्या कानाखाली मारल्याचा आरोपही पाडसवान कुटुंबीयांनी केला.