छत्रपती संभाजीनगर :पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी पुढाकार घेत सर्व लोकप्रतिनिधीसोबत समन्वय ठेवून गणेशोत्सव आणि शिवजयंती डीजेमुक्त साजरी करण्याचा यशस्वी प्रयोग राबविला. त्याच धर्तीवर आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही डीजे आणि लेझरमुक्त साजरी करून शहराने नवा आदर्श प्रस्थापित करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून डीजे किंवा लेझरचा वापर केल्यास थेट साहित्य जप्त करून गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा परिमंडळ-१ चे पोलिस उपायुक्त पंकज अतुरकर यांनी दिला.
क्रांती चौक हद्दीतील गांधी भवन येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दिनकर ओंकार यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत जयंती उत्सव आनंदात, उत्साहात परंतु शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस अरुण बोर्डे, विजय वाहुळ, साहेबराव नवतुरे, अभय टाकसाळ, विनोद बनकर यांच्यासह समितीचे ३० ते ३५ पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर महावितरणने योग्य प्रकाशव्यवस्था करावी, लोंबकळणाऱ्या तारा सुरक्षित कराव्यात, तसेच महापालिकेने फिरते शौचालय, पिण्याचे पाणी आणि गल्लीबोळांत बॅरिकेडिंग करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर बोलताना उपायुक्त अतुरकर म्हणाले की, या सुविधांसाठी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार झाला असून, लवकरच संयुक्त बैठक घेऊन सर्व त्रुटी दूर केल्या जातील, असे बैठकीत आश्वासित करण्यात आले.
एक मंडळ, एक अंमलदार सूत्र लागू
मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी यंदा एक मंडळ, एक अंमलदार या सूत्राची अंमलबजावणी केली जाणार आहे. पोलिस महासंचालक कार्यालयाचा हा निर्णय असून, मिरवणूक सुरू झाल्यापासून ती संपेपर्यंत संबंधित पोलिस ठाण्याचा एक अंमलदार प्रत्येक मंडळासोबत कायमस्वरूपी तैनात असेल.
पोलिसांच्या महत्त्वपूर्ण सूचना
दागिन्यांची सुरक्षा : मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या होऊ नयेत यासाठी महिला व नागरिकांनी आपले दागिने आणि मोबाईलची स्वतः काळजी घ्यावी.
स्टेजबाबत कडक नियम: क्रांती चौकात कोणत्याही नवीन स्टेजला परवानगी दिली जाणार नाही. जुन्या मंडळांनी पोलिसांच्या जागेतच स्टेज उभारावेत; रस्ता अडवू नये.
मोठ्या काठीचे झेंडे नकोत : मिरवणुकीत मोठ्या काठीचे झेंडे फिरवताना इतरांना इजा होण्याची शक्यता असते, असे आढळल्यास झेंडे जप्त केले जातील.
पार्किंगच्या शिस्तीचे पालन : रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक कोंडी करू नये. अधिकृत पार्किंगच्या जागेचाच वापर करावा.
वाहनांचे ऑडिट : मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व वाहनांचे आरटीओ कार्यालयाकडून ऑडिट करून घेणे अनिवार्य आहे.