Paithan Vihamandwa School Mid Day Meal Stolen
पैठण : पैठण तालुक्यातील विहामांडवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या शालेय पोषण आहाराच्या साहित्याची पुन्हा एकदा चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्याने वर्गखोलीचे कुलूप तोडून ४९ लिटर तेलासह अन्य साहित्य लंपास केले. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच शाळेत पोषण आहाराच्या साहित्याची चोरी झाली होती. त्या घटनेचा अद्याप तपास लागलेला नसल्याने आता दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विहामांडवा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत शाळेला उपलब्ध होणारे तेल तसेच अन्य खाद्यसाहित्य एका वर्गखोलीत सुरक्षित ठेवण्यात येते.
१३ जून २०२६ रोजी याच वर्गखोलीचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने पोषण आहारातील तेल आणि अन्य साहित्य चोरी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका खोसे यांनी विहामांडवा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली होती.
मात्र, या घटनेला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही चोरीचा तपास लागलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिल्या चोरीचा तपास प्रलंबित असतानाच २३ ऑगस्ट रोजी पुन्हा अज्ञात चोरट्याने पोषण आहाराचे साहित्य ठेवलेल्या वर्गखोलीचे कुलूप तोडले. या वेळी चोरट्यांनी ४९ लिटर तेलासह अन्य साहित्य चोरून नेले.
दुसऱ्यांदा चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका अलका खोसे यांनी पोलिसांना माहिती देत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पंचनामा केला.
एकाच शाळेत पोषण आहाराच्या साहित्याची वारंवार चोरी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच शाळेतील साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पहिल्या चोरीचा अद्याप तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच पद्धतीने चोरी झाल्याने या प्रकरणात पोलिसांच्या तपासाची दिशा आणि भूमिका काय, असा सवाल विद्यार्थ्यांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
पहिल्या चोरीचा तपास पूर्ण करून चोरट्यांचा छडा लावला असता कदाचित दुसरी घटना टाळता आली असती, अशी भावना पालकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे दोन्ही चोरींचा सखोल तपास करून दोषींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी होत आहे.