Paithan Solar Pump Wire Theft
पैठण : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विहामांडवा-खंडाळा परिसरात सोलर पंपांच्या वायर आणि मोटारी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी (दि. २८) रात्री अज्ञात चोरट्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंपांच्या वायर आणि मोटारी चोरून नेल्याचे उघडकीस आले. या घटनेत सात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वीही पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंपांच्या वायर आणि मोटारी चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी त्रस्त असतानाच विहामांडवा-खंडाळा परिसरात पुन्हा चोरीच्या घटना घडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून सोलर पंपांच्या वायर तसेच मोटारी लंपास केल्या. सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामेश्वर गाभूड, रंगनाथ गाभूड, गुलाब गाभूड, नवनाथ पाटेकर, भगवान आरगडे आणि बाळू आरगडे या शेतकऱ्यांनी विहामांडवा पोलीस चौकीत तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक हरीविजय बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार विजय बामदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला असून, परिसरातील चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंप व साहित्य चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे