Paithan Tehsil Office Talathi Bribe Case
पैठण : पैठण तालुक्यातील वडवळी सज्जाचे तलाठी दिलीप कांबळे यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शुक्रवारी (दि. २५) दुपारी रंगेहाथ पकडले. पैठण तहसील कार्यालयाच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली.
वडवळी येथील एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा शेतीच्या वादासंदर्भात वाद सुरू होता. या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तलाठी दिलीप कांबळे यांनी संबंधित शेतकऱ्याकडे पैशांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने शुक्रवारी पैठण तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच तलाठी दिलीप कांबळे यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
या कारवाईनंतर पैठण महसूल विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कांबळे यांच्याविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली.