ट्रक मालकाकडून मुद्देमाल जप्त केला. यावेळी सपोनि ईश्वर जगदाळे, उपनिरीक्षक संभाजी खाडे व पोलीस पथक Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime | ट्रक मालकाकडून १ कोटीच्या सुपारीची गुजरातमध्ये परस्पर विक्री

Paithan Police | पैठण एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची काही तासांत मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Paithan Betel Nut Theft Case

पैठण : कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून गुजरातमधील व्यापाऱ्याला देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या सुपारीचा परस्पर अपहार करून ती गुजरातमध्ये विकणाऱ्या ट्रक मालकाचा एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने काही तासांतच शोध लावला आहे. या कारवाईत ७३ लाख ५३ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

कर्नाटकातील मंगळुरू येथील साऊथ इंडियन ट्रान्सपोर्ट एजन्सीकडून ट्रक ( GJ 10 Z-5029) मधून २५ टन ३७८ किलो वजनाच्या सुपारीच्या ३२० गोण्या गुजरातमधील व्यापाऱ्याला पोहोचवण्यासाठी पाठवण्यात आल्या होत्या. मात्र ट्रक मालक दिनेश जेठभाई सोलंकी (रा. पोरबंदर, गुजरात) याने हा माल व्यापाऱ्याला न देता अपहार करण्याचा डाव आखला.

मांजरसुंबा (बीड) घाटातील एका ढाब्यावर ट्रक चालक महमूद सुमरा याला दारू पाजून झोपवण्यात आले. चालक झोपी गेल्यानंतर ट्रक मालकाने वाहन ताब्यात घेऊन पाचोड–दावरवाडी–पैठण मार्गे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढोरकीन येथील एका पेट्रोल पंपाजवळ ट्रक उभा केला. त्यानंतर इतर वाहनांच्या मदतीने सुपारीच्या सर्व ३२० गोण्या उतरवून ट्रक मालक फरार झाला.

काही वेळाने चालक जागा झाल्यानंतर ट्रक मालक सोबत नसल्याचे तसेच ट्रकमधील सुपारी गायब असल्याचे त्याच्या लक्षात आले. चालकाने ट्रक मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाईल बंद होता. त्यानंतर ट्रान्सपोर्ट एजन्सीच्या मॅनेजरला घटनेची माहिती देण्यात आली. रविवारी (दि. ११) एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. पाचोड, दावरवाडी व पैठण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.

अखेर काही तासांतच तपासाला यश आले. ट्रक मालक दिनेश सोलंकी यानेच सुपारीचा अपहार करून गुजरातमध्ये विक्री केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी गुजरात परिसरातून विक्री केलेल्या ३२० गोण्यांपैकी ७३ लाख ५३ हजार ९८६ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मिसुळे, उपनिरीक्षक संभाजी खाडे, दशरथ बुरुकुल, पो.ना. गोपाल पाटील, विठ्ठल डोके, राहुल गायकवाड, समाधान दुबिले, करतारसिंग सिंगल, दाभाडे, रहाटवाड, उगले, पंडित, संदीप खरात आदींच्या पथकाने केली.

दरम्यान, गुन्हा करताना सुपारी वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली इतर वाहने तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT