Paithan Temple Donation Box Theft Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Paithan Theft | पाचोड परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; महादेव मंदिरांच्या दानपेट्यांसह किराणा दुकान फोडले

पाचोड पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह; सोलर पंपांच्या वायर चोरीचा तपास अद्याप प्रलंबित

पुढारी वृत्तसेवा

Paithan Temple Donation Box Theft

पैठण : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, शेतकऱ्यांच्या सोलर पंपांच्या वायर व मोटारींच्या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसतानाच अज्ञात चोरट्यांनी दोन महादेव मंदिरांच्या दानपेट्यांसह किराणा दुकानावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पाचोड पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मागील दोन आठवड्यांपूर्वी विहामांडवा, खंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पंपांच्या वायर व मोटारी चोरीला गेल्या होत्या. या घटनांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसतानाच सोमवारी (दि. १४) रात्री अज्ञात चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घातला.

नगदेश्वर महादेव मंदिर तसेच देवगाव येथील महादेव मंदिरातील दानपेट्या फोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. त्याच रात्री आडुळ खुर्द येथील एका किराणा दुकानालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात असताना चोरीच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बंदोबस्त असतानाही चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या चोरीच्या घटनांकडे पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच प्रलंबित चोरीच्या घटनांचा तपास तातडीने लावावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.

या प्रकरणी मंगळवारी दुपारपर्यंत पाचोड पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल झालेली नव्हती. त्यामुळे चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही. पाचोड पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT