

पैठण : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्युत केबल चोरीच्या घटनांचा पाचोड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाचोड, मुरमा, थेरगाव, विहामांडवा तसेच परिसरातील शेतवाड्या आणि वस्त्यांमधून विद्युत केबल चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. या प्रकारामुळे आधीच विविध समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले होते. वारंवार होणाऱ्या चोरीमुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनांची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी विशेष पथकाची स्थापना केली. पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू करून आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान मंगळवारी (दि. १६) दोन संशयितांना छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश कैलास शिंदे (रा. शुरबंगला, ता. वैजापूर) आणि अमोल मिठू माळी (रा. मुरमा, ता. पैठण) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान त्यांनी इतर साथीदारांसह विविध ठिकाणी विद्युत केबल चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत गोपनीय माहिती संकलित केली आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, पोलीस कॉन्स्टेबल ताराचंद घडे आणि विष्णू सानप यांनी केली. आरोपींना पाचोड पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी परिसरातील अनेक केबल चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली.
अटक आरोपींना पैठण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत.