स्वीकृत सदस्यासाठी भाजप, एमआयएममध्ये चढाओढ File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar municipal corporation : स्वीकृत सदस्यासाठी भाजप, एमआयएममध्ये चढाओढ

नेत्यांचे नातेवाईकही रिंगणात, जुन्यांना डावलून नव्यांना संधी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेत यंदा स्वीकृत नगरसेवकांची संख्या ही १० राहणार आहे. यात सर्वाधिक नगरसेवक भाजप आणि एमआयएमचे असल्याने त्यांच्या वाट्याला सर्वाधिक स्वीकृत सदस्यपद येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये सध्या चढाओढ सुरू असून, यात नेत्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणेच जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी देण्यात येते का, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीसह विषय समितींच्या सभापती पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता स्वीकृत नगर-सेवक आणि प्रभाग सभापतींची निवड होणे शिल्लक आहे. यातील स्वीकृत नगरसेवकांसाठी येत्या बुधवारपासून उमेदवारी अर्ज वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे. २५ मार्चपर्यंत अर्ज वितरित केल्यानंतर ३० मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. त्यानंतर १ एप्रिल रोजी अर्जाची छाननी केली जाणार आहे.

दरम्यान, भाजपचे सर्वाधिक ५६ नगर-सेवक निवडून आले आहेत. त्यामुळे १० पैकी ५ स्वीकृत सदस्य भाजपच्या वाट्याला येणार आहेत. यासाठी तब्बल १७३ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. यात नेत्यांच्या नातेवाईकांचा देखील समावेश असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच महापालिका निवडणुकीत ज्यांनी उमेदवारी न मिळाल्याने पक्षाच्या प्रचार कार्यालयात राडा केला होता, त्यांनीही अर्ज दाखल केले आहेत. एमआयएममध्येही माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकपदासाठी कंबर कसली आहे.

एमआयएमचे दरवर्षी ३ सदस्य

एमआयएमचे ३३ नगरसेवक निवडून आले असल्याने त्यांच्या वाट्याला ३ सदस्य येणार आहेत. अनेकांना संधी मिळावी, यासाठी एमआयएम एक-एक वर्षासाठी स्वीकृत सदस्यपद देणार आहे. त्यानुसार पाच वर्षांत १५ जणांना संधी देणार असल्याचे पक्षाच्या काही नगर-सेवकांनी सांगितले.

भाजपची समिती घेणार निर्णय- भाजपला स्वीकृत सदस्य पदासाठी जे अर्ज प्राप्त झाले आहेत, ते सर्व अर्ज कोअर कमिटीमार्फत प्रदेशाकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यांच्याकडूनच पाचही सदस्य निश्चित केले जाणार आहेत.
किशोर शितोळे, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT