Digital Arrest : निवृत्त प्राध्यापकाचे ३२ लाख हडपणाऱ्या दोन भामट्यांना बेड्या Pudhari File Photo
छत्रपती संभाजीनगर

Digital Arrest : निवृत्त प्राध्यापकाचे ३२ लाख हडपणाऱ्या दोन भामट्यांना बेड्या

डिजिटल अरेस्ट : गुजरात गाठून आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Two thugs who take Rs 32 lakh from a retired professor arrested

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा ईडीच्या केसमध्ये राजेशकुमार वडालिया कनूभाई चोटानी अटकेची भीती घालून ८४ वर्षीय निवृत्त प्राध्यापकाला डिजिटल अरेस्ट ठेवून तब्बल ३२ लाख ५० हजार उकळणाऱ्या टोळीतील दोन भामट्यांना थेट गुजरातच्या जुनागढ येथून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

राजेशकुमार कांजीभाई वडालिया (५२) आणि कनुभाई पुनाभाई चोटानी (४५, दोघेही रा. जुनागढ, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या भामट्यांची नावे आहेत. तर, त्यांचा साथीदार दिपेनकुमार गिरीशभाई टिलवा हा अद्याप पसार आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुदाम राजभोज (८४, रा. जयसिंगपुरा) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून निवृत्त झाले आहेत. ९ ते १८ सप्टेंबर २०२५ या काळात सायबर भामट्यांनी त्यांना टार्गेट केले. ईडीच्या कारवाईचा बडगा दाखवून त्यांना तब्बल दहा दिवस डिजिटल अरेस्ट करून मानसिक दहशतीखाली ठेवले होते.

अटक टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील, या धमकीमुळे भयभीत झालेल्या प्राध्यापकांनी बँकेतील एफडी मोडली. आरटीजीए-सद्वारे तब्बल २८ लाख ५० हजार रुपये आरोपींच्या गुजरात येथील आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात ट्रान्सफर केले.

भामट्यांची भूक एवढ्यावरच थांबली नाही, त्यांनी आणखी पैशाची मागणी केल्यावर उरलेले ४ लाख रुपये इंडियन ओव्हरसीज बँकेच्या खात्यात वळते करण्यात आले. आयुष्यभराची पुंजी एका झटक्यात लुटली गेल्याने कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला. बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली.

असा खेळला डबिंगचा खेळ

आरोपींनी वयोवृद्ध प्राध्यापकांना व्हिडिओ कॉल केला. मात्र स्वतःचा चेहरा न दाखवता स्क्रीनवर एका पोलिस अधिकाऱ्याचा फोटो ठेवला. त्याच्या मागून ते स्वतः डबिंग करून हुबेहूब अधिकाऱ्याच्या आवाजात बोलत होते. वयोवृद्ध प्राध्यापकांना हा तांत्रिक बनाव लक्षात न आल्याने ते या जाळ्यात अलगद अडकले.

असा लावला छडा

सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास हाती घेतला. तब्बल २८ लाख ५० हजारांची रक्कम जुनागढ (गुजरात) येथील ज्या बँक खात्यात वळती झाली होती, त्या खात्याशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकांचे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्याआधारे शहर पोलिसांच्या पथकाने थेट गुजरात गाठले आणि सापळा रचून दोन आरोपींना गजाआड केले. टोळीतील अन्य फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कारवाई करणाऱ्या पथकात उपनिरीक्षक राम यादव, लक्ष्मण सोनवणे, सुदर्शन एखंडे, उमेश चव्हाण यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT