Chhatrapati Sambhajinagar Municipal corporation File Photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : महानगरपालिकेची लढाई विरोधकांऐवजी आपापसांतच

पंधरा प्रभागांत भाजप, शिवसेना, ठाकरे सेनेतच लढाई; एमआयएमच्या प्रभागांमध्ये उमेदवारच नाहीत

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: The Municipal Corporation's battle is among itself instead of the opposition

छत्रपती संभजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आतापर्यंतच्या निवडणुका खान पाहिजे की बाण, या एकाच मुद्द्द्यावर लढल्या गेल्या. या निवडणुकीतही एमआयएम हाच आमचा शतू असल्याचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले. मात्र पंधरा प्रभागांत एमआयएम कुठेही नाही. तिथे केवळ भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध ठाकरेसेना अशीच लढाई होत आहे. तर सात प्रभागात भाजप, शिव सेना आणि ठाकरेसेनेला उमेदवार देता आलेले नाहीत. त्यामुळे तिथे एमआयएम विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे.

महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकूण २९ प्रभागांतून ११५ सदस्य निवडण्यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्याआधी राजकीय पक्षांकडून एकमेकांविरोधात रान पेटविले जात आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवत आहेत. तसेच एमआयएमनेही मुस्लिम बहुल भागात आपले उमेदवार उभे केले आहेत. सध्या भाजप आणि शिवसे-नेकडून एमआयएमविरोधात जोरदार प्रचार केला जात आहे. छोटेखानी सभांमधून शिवसेना आणि भाजप एमआयएमविरुद्ध रान उठवत आहेत.

आपली लढाई एमआयएम विरुद्ध असल्याचे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात शहरातील २९ प्रभागांचा आढावा घेतल्यास एमआयएम ऐवजी भाजप, शिवसेना आणि ठाकरेसेना हेच एकमेकांविरुद्ध उभे असल्याचे चित्र आहे. तर जिथे एमआयएम आहे तिथे या तिन्ही पक्षांचे उमेदवार नाही. त्या प्रभागांमध्ये एमआयएम विरुद्ध काँग्रेस असा सामना होत आहे.

शहरातील प्रभाग ५, ६, १२, १३, १४ या प्रभागांमध्ये भाजप, शिवसेना आणि ठाकरेसेनेने उमेदवार दिलेले नाहीत. यासोबतच प्रभाग ९ आणि २८ मध्येही प्रत्येकी चार चार जागांसाठी या पक्षाने कुठे एक, तर कुठे दोन उमेदवारच उभे केले आहेत. तर प्रभाग ७, ८, १०, ११, १७ १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६ आणि प्रभाग क्रमांक २७ मध्ये एमआयएमने एकही उमेदवार दिलेला नाही.

कोणाचे किती उमेदवार ?

महापालिका निवडणुकीच्या आखाड्यात शिवसेनेने सर्वाधिक ९६ जागांवर उमेदवार उतरविले आहेत. त्यापाठोपाठ ठाकरे सेनेने ९५ आणि भाजपाने ९२ जागांवर उमेदवार दिले आहेत. एमआयएम ४९, काँग्रेस ७३, राष्ट्रवादी काँग्रेस ८७ आणि वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढवत आहेत.

एमआयएमला बंडखोरांचे आव्हान

एमआयएमचे मागीलवेळी २५ नगरसेवक होते. त्यातील ६ जण हे इतर पक्षांत गेले. ४ माजी नगरसेवकांनी ऐनवेळी निवडणूक लढण्यास नकार दिला. जे पंधरा माजी नगरसेवक उरले होते, त्यातील केवळ चार जणांनाच एमआयएमने पुन्हा उमेदवारी दिली. तब्बल अकरा जणांचे तिकीट कापले गेले. त्यामुळे एमआयएममध्ये प्रचंड नाराजी पसरली. यातील बहुसंख्य माजी नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे एमआयएमला इतर पक्षांपेक्षा बंडखोरांचेच आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT