Sambhajinagar News : त्रासदायक उकाड्यात लसीकरणाचा जीवघेणा खेळ file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : त्रासदायक उकाड्यात लसीकरणाचा जीवघेणा खेळ

खुलताबाद शासकीय रुग्णालयातील गैरसोयींवर नगराध्यक्ष संतप्त

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: The Life-Threatening Ordeal of Vaccination Amidst Oppressive Heat

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा :

शहरातील शासकीय रुग्णालयात बालकांना लसीकरण देणे तसेच गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी एका जुन्या, अर्धवट वापरात असलेल्या आणि अत्यंत गैरसोयीच्या इमारतीत सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कडक उन्हाळ्यात नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवत आरोग्य सेवा पुरविल्या जात असल्याने संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांकडून सतत तक्रारी येत असल्याने नगराध्यक्ष आमेर पटेल व नगरसेवक अनीस जहागीरदार यांनी बुधवारी (दि.१३) दुपारी अचानक शासकीय

रुग्णालयाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय जुन्या इमारतीत जाऊन पाहणी केली असता तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे निदर्शनास आले.

इमारतीत कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट दिसून आले. विशेष म्हणजे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी पंख्यांचीसुद्धा व्यवस्था नसल्याने बालके उकाड्याने हैराण होत रडत असल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक गर्भवती महिलांना तासनतास घामाघूम अवस्थेत बसून तपासणीची प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही समोर आले. विशेष म्हणजे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे समोर आले.

सध्या राज्यभर उन्हाची तीव्रता वाढलेली असून तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. अशा परिस्थितीत लहान मुले, बालके आणि गर्भवती महिलांसारख्या संवेदनशील घटकांना योग्य सुविधा देण्याऐवजी जुन्या आणि असुविधाजनक इमारतीत आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात आल्याने नगराध्यक्ष व नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये अशा प्रकारची हलगर्जीपणा अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

लसीकरणासाठी इमारतीचा वापर

सदर इमारत यापूर्वी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासाठी वापरण्यात येत होती. इमारतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ती रिकामी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही काही महिला कर्मचारी या ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण तसेच गर्भवती महिलांची तपासणी करण्यासाठी वापर करत असल्याचे समोर आले. आठवड्यातील दर बुधवार दिवशी बालकांना डोस देण्यासाठी तर दर शुक्रवार दिवशी गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी हीच इमारत वापरण्यात येत असल्याचे पाहणीत उघड झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT