Sambhajinagar News : रहिवाशांना बाहेर काढत धोकादायक इमारतींवर हतोडा file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : रहिवाशांना बाहेर काढत धोकादायक इमारतींवर हतोडा

सिटी चौकातील अत्तर गल्लीत मनपाची कारवाई : दोन जीर्ण इमारती जमीनदोस्त

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: Residents evacuated; demolition of dangerous buildings begins

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू केली असून, बुधवारी (दि.५) सिटी चौक परिसरातील अत्तर गल्लीत धोकादायक ठरलेल्या दोन जीर्ण इमारतींवर अखेर हतोडा चालवला. यावेळी एका इमारतीत मालक मुलासह वास्तव्यास असल्याने त्यांना सामानासह सुरक्षित बाहेर काढल्यानंतरच पाडकाम करण्यात आले. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र महापालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई पूर्ण केली.

पावसाळ्यात संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ४१ इमारती धोकादायक असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित मालमत्ताधारकांना अनेकदा नोटीस बजावूनही कारवाई झाली नव्हती. काही ठिकाणी मालक भाडेकरू वाद, तर काही ठिकाणी मालकांच्या दुर्लक्षामुळे धोकादायक इमारती तशाच उभ्या होत्या. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त सविता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव पथकाने ही मोहीम राबविली.

यावेळी अत्तर गल्लीतील अमृत भाकरे व महमद सईद यांच्या संयुक्त मालकीची सुमारे ८० वर्षे जुनी तीन मजली इमारत मोडकळीस आल्याने ती धोकादायक ठरली होती. तसेच गेल्या तीन-चार वर्षांपासून नोटिसा देऊनही इमारत हटविण्यात आली नव्हती. त्यामुळे बुधवारी महापालिका अतिक्रमण हटाव पथकाने मालक व त्यांच्या मुलाला सामानासह बाहेर काढून इमारत जमीनदोस्त केली.

यानंतर लगतच असलेली महमद सईद यांची जीर्ण इमारतही पाडण्यात आली. सागवान लाकडात उभारलेल्या या इमारतीतील लाकूड व मलबा स्वतः हटविण्याची तयारी मालकांनी दर्शविली. या कारवाईदरम्यान उपायुक्त नंदकिशोर भोम्बे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच महापालिकेने शहरातील उर्वरित धोकादायक इमारतींवरही लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. या मोहिमेत झोन-१च्या सहायक आयुक्त लता पुजारी, सहायक आयुक्त संजय सुरडकर, इमारत निरीक्षक रवींद्र देसाई, अतिक्रमण हटाव पथक आणि नागरी मित्र पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT