Sambhajinagar News : एसटीच्या विश्रामगृहात असुविधांचा डोंगर file photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : एसटीच्या विश्रामगृहात असुविधांचा डोंगर

चालक-वाहकांचे स्वतःचे अंथरूण, | काही ठिकाणी तकलादू पलंग, जुन्या गाद्या |बेडशीट, उशीचा पत्ताच नाही

पुढारी वृत्तसेवा

Sambhajinagar News: No Facilities for Employees at ST Rest House

जे. ई. देशकर

छत्रपती संभाजीनगर : विविध आगारांत मुक्कामी असलेल्या चालक-वाहकांना पुरता आराम मिळावा म्हणून मुख्य बसस्थानक, सिडकोसह सर्वच आगारांत विश्रामगृह आहेत. मात्र त्यात पुरेशा सुविधा नसल्याने चक्क स्वतःचे अंथरूण आणून खाली झोपावे लागत आहेत. तर काही ठिकाणी जुन्या पलंगासह जुन्या गाद्यावर रात्र काढण्याची वेळ येत आहे. गाद्यावर ना बेडशीट, ना डोक्याखाली उशी तसेच ना पिण्यासाठी शुद्ध पाणी. अशा असवस्थेत चालक-वाहकांना पूर्ण विश्रांती कशी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुख्य बसस्थानकासह सिडको बसस्थानकातही चालक-वाहकांसाठी विश्रामगृहाची सुविधा उपलब्ध आहे. हे विश्रामगृह केवळ नावापुरतेच विश्रामगृह बनले आहे. मुख्य बसस्थानकात केवळ फॅन, जुन्या पुराण्या गाद्या आणि पलंग एवढीच सुविधा आहे. तर सिडको आगारातील विश्रामगृहात ना गादी ना पालंग स्वतःचे अंथरूण आणून खाली झोपावे लागत आहे. एकाच हॉलमध्ये मेंढर कोंबल्यासारखे ७० ते ८० चालक-वाहकांना झोपावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा विश्राम तर दूरच रात्र तळमळत काढावी लागत आहे.

महिलांचा विश्राम वाऱ्यावर

महिला चालक-वाहक रात्रपाळीचे कर्तव्य करत नसले तरी दिवसा त्यांना काही कारणास्तव विश्राम करण्याची गरज पडली तर त्यांच्या नावाचे केवळ एक खोलीचे विश्रामगृह बनवण्यात आले आहे. त्यात आराम करण्यासाठी कुठलीच सुविधा नाही. ही अवस्था शहरातील आहे, तर ग्रामीण भागात याबाबत न विचारलेलेच बरे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे

ग्रामीण भागात नावालाच विश्रामगृह

जिल्ह्यातील सर्वच आगारांत छोटे छोटे विश्रामगृह बनवण्यात आले आहेत. दरम्यान, यात काहीच सुविधा नसल्याने अनेकदा चालक-वाहक बसमध्येच रात्र काढत आहेत. त्या विश्रामगृहात ना पलंग ना गादी सोबत आण-लेल्या कापडांवर अंग टाकावे लागत आहे.

बाहेरील व्यक्तींचा वावर

नियमानुसार विश्रामगृहात तीन पाळीत सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे, परंतु अधिकारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने येथील चालक-वाहकांना जीव मुठीत धरूनच रात्र काढावी लागत आहे. येथे सुरक्षारक्षक नसल्याने अनेकदा परिसरातील तळीराम परिसरात येऊन दादागिरी करतात. त्यामुळे चालक-वाहकांना विश्रांती ऐवजी काळजीच जास्त करावी लागत आहे.

शुद्ध पाणी, इतर सुविधांचा विसर

चालक-वाहकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. किंवा हिवाळ्यात गरम पाण्याची व्यवस्था नाही. तसेच परिसरही अस्वच्छ राहत असल्याने त्या ठिकाणी डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. उन्हाच्या कडाक्यात केवळ डोक्यावरील पंख्याच्या आधारेच रात्र काढावी लागत आहे. तसेच कूलर तर सोडा इतर व्यवस्थाही नाही

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT