Sambhajinagar News: Municipal Corporation Machinery Prepared for Emergency Response Ahead of Monsoon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आ-पत्ती व्यवस्थापनाची व्यापक तयारी सुरू करण्यात आली असून, नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात स्कुबा डायसचे प्रत्येकी १५ कर्मचाऱ्यांचे दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासह १६ फ्लोटिंग पंप असून, १६ टेलर पंप, २ क्वीक रिस्पॉन्स टीम, २ रेस्क्यू टीम याप्रमाणे पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेकडून मान्सूनपूर्व तयारी सुरू करण्यात आली असून, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर स्वतंत्र जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात स्मार्ट सिटी कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात येणार असून, अग्निशमन विभागाचे नियंत्रण कक्षही २४ तास कार्यरत ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हसूल तलाव परिसरात पोहण्यास तसेच विनाकारण फिरण्यास १५ बंदी घालण्यात आली आहे. तलाव परिसरात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येकी कर्मचाऱ्यांची स्कुबा डायव्हर्सची दोन विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांकडे आवश्यक सुरक्षासाहित्य आणि बचाव उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दरम्यान, पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्यास तातडीने उपसा करता यावा यासाठी यांत्रिकी विभागाने १६ फ्लोटिंग पंप आणि १६ टेलर पंप सज्ज ठेवले आहेत. तसेच दोन रेस्क्यू टीम, दोन क्वीक रिस्पॉन्स टीम, दोन होमगार्ड पथके आणि १६ फायर टेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी या सर्व पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मान्सूनपूर्व नालेसफाई, धोकादायक ठिकाणांची पाहणी आणि आपत्कालीन यंत्रणांची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांना अडचणी निर्माण होऊ नयेत, आपत्तीच्या वेळी तातडीने मदत पोहोचवता यावी यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
हर्सूल तलाव परिसरात प्रवेशावर निर्बंध
पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी हसूल तलाव परिसरात पोहणे व विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.