Sambhajinagar News; MLA Rohit - Pawar on the road demanding loan waiver; Road blockade at Cambridge Chowk
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, पीकविम्याची थकीत रक्कम तातडीने अदा करावी, यासह विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि.२७) केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, सरकारने दखल न घेतल्यास त्याच ठिकाणी जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी दिला.
शुक्रवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. हे आंदोलन कोणत्याही पक्षासाठी नसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर येथे सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी शासनाने आश्वासन दिले; मात्र त्याची पूर्तता झाली नाही.
त्यामुळे आता शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार डॉ. कल्याण काळे, विविध पक्षांचे नेते, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, डॉ. नरेंद्र काळे, नीलेश राऊत, आदी उपस्थित होते.
सरकारवर केली टीका
दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी ३१ हजार कोटी रुपयांचा पीकविमा जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी केवळ १० हजार कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित २१ हजार कोटी रुपये कुठे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पेपरवर घोषणा करून चालणार नाही, तर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहोचली पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनाच का झळ बसते? शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण का होत नाहीत? असा सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली.
शक्तिपीठ महामार्गावरून सरकारवर आरोप
समृद्धी महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्यात आलेली नाही, असे रोहित पवार म्हणाले. शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सरकार हा प्रकल्प रेटत असल्याची टीकाही त्यांनी केली.