Sambhajinagar news Light showers fell on the third day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने गुरुवारी (दि. २५) तिसऱ्या दिवशी काही भागात हलक्या स्वरूपात हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असले तरी काहीसा पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु पुढील पाच दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
शहर व परिसरात मंगळवारी व बुधवारी असे सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाला. मात्र गुरुवारी दिवसभर विश्रांती घेतलेला पाऊस रात्री काही भागांत हलक्या स्वरूपात बरसला. दरम्यान, आज शुक्रवारी काही ठिकाणी कालावधीत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पुढील पाच दिवसांत कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या दरम्यान, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे.
यासह सापेक्ष आर्द्रता ६९ ते २२ टक्क्यांदरम्यान राहणार असल्याने वातावरणात दमटपणा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, विस्तारित अंदाजानुसार ३० जून ते ६ जुलै या कालावधीतही जिल्ह्यात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. मात्र कमाल व किमान तापमान सरासरीच्या आसपासच राहील, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.