Sambhajinagar News: Inquiry to be held into works carried out during the administrative tenure
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेत गेल्या चार वर्षांत प्रशासक राजवटीत कोट्यवधींच्या खर्चा झाल्याचा आरोपनंतर या कामकाजांचा हिशोब अखेर होणार आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे जिल्हा परिषद वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने पावले उचलत तब्बल १४ महत्त्वाच्या विभागांना श्वेतपत्रिका काढण्याचे कडक आदेश दिले आहेत. यामुळे संबंधित विभागांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करण्यात आले आहेत. यानुसार गेल्या चार वर्षांतील विकासकामांचे प्रस्ताव, मंजूर निधी, प्रत्यक्ष वाटप आणि झालेल्या खर्चाचा सविस्तर ताळेबंद सादर करावा लागणार आहे.
जलजीवन मिशन, आरोग्य, बांधकाम, शिक्षण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन आणि जलसंधारण या प्रमुख विभागांचा यात समावेश आहे. या विभागांमधील रस्ते बांधकामे, शाळा दुरुस्ती, औषध खरेदी, साहित्य खरेदी, पाझर तलाव व बंधाऱ्यांची कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत
प्रत्येक फाईलची होणार तपासणी
याबाबत अध्यक्ष अविनाश गलांडे पाटील म्हणाले, संबंधित विभागांचा अहवाल समोर आल्यानंतर नेमकी स्थिती स्पष्ट होईल. चौकशीत कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा गैरव्यवहार आढळल्यास दोषींवर कडक कारवाई केली जाईल. यामुळे आता प्रशासक काळात झालेल्या प्रत्येक फाईलची कसून तपासणी होणार हे निश्चित झाले आहे.
डॉ. पठाडे यांनी उचलला होता आवाज
शिवसेनेचे गटनेते राधाकिसन पठाडे यांनी प्रशासक काळात मोठ्या प्रमाणावर गैख्यवहार झाल्याचा थेट आरोप केला होता. कामे केवळ कागदावरच रंगवली गेली की प्रत्यक्ष जमिनीवर उतरली, असा सवाल उपस्थित करत ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद स्तरापर्यंतच्या खर्चाची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती.