Sambhajinagar News : Finally, cleaning of the drain in the parking lot of the municipal headquarters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका मुख्यालयातील वाहनतळात पावसाचे पाणी साचून वीज नियंत्रण कक्षात शिरल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने शुक्रवारी (दि.३) संबंधित नालीची साफसफाई केली. नालीवरील जाळ्या काढून त्याखाली साचलेला गाळ आणि माती हटविण्यात आली. मात्र वाहनतळातील पावसाच्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होण्यासाठी आवश्यक व्यवस्था नसल्याने ही कारवाई केवळ तात्पुरती ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर महापालिका मुख्यालयाच्या वाहनतळात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
हे पाणी थेट मुख्य प्रवेशद्वाराजवळील वीज नियंत्रण कक्षात शिरल्याने संभाव्य विद्युत दुर्घटनेचा धोका निर्माण झाला होता. सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मात्र या प्रकारामुळे मुख्यालयातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या.
या घटनेनंतर मनपाने शुक्रवारी नालीतील गाळ काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र वाहनतळातून पाणी बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी किंवा प्रभावी ड्रेनेज व्यवस्था नसल्याने भविष्यातही पाणी साचण्याचा धोका कायम राहणार आहे. त्यामुळे केवळ नालीची साफसफाई करून हा प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे दिसून येत आहे.
नाली स्वच्छ, पण धोका कायम
वाहनतळाच्या नालीतील गाळ काढल्यामुळे पाण्याचा प्रवाह काही प्रमाणात सुधारला असला, तरी मुसळधार पावसात वाहनतळात पुन्हा पाणी साचण्याची शक्यता कायम आहे. परिणामी, तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे.
वीज नियंत्रण कक्षाची सुरक्षितता महत्त्वाची
महापालिका मुख्यालयाच्या संपूर्ण वीज पुरवठ्याचे नियंत्रण या कक्षातून केले जाते. भविष्यात पुन्हा पाणी शिरल्यास विद्युत यंत्रणेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारून संभाव्य धोके टाळणे गरजेचे आहे.