Sambhajinagar News: Eid-ul-Fitr Celebrated with Enthusiasm in the City
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
चंद्रदर्शन झाल्याने देशभरात शनिवारी (दि. २१) ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छावणी येथील मुख्य ईदगाहसह रोजाबाग, उस्मानपुराच्या ईदगाहवर हजारो मुस्लिम बांधवांनी विशेष नमाज अदा केली. तसेच देशात सुखसंमृद्धी आणि शांती राहू दे, अशी प्रार्थना केली.
यावेळी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील, माजी आमदार एम.एम.शेख, नगरसेवक अमित भुईगळ, नवीन ओबेरॉय यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवित्र रमजाननिमित्त संपूर्ण महिनाभर मुस्लिम बांधवांनी रोजे करून अल्लाहची इबादत केल्यावर शुक्रवारी (दि. २०) चंद्रदर्शन झाले.
यानंतर शहरभराच्या मुख्यबाजारपेठेत रात्री उशिरापर्यंत खरेदी करणारे मुस्लिम बांधव एकमेकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देताना दिसून आले. रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ हाऊसफुल होती. ईदची विशेष नमाज अदा करण्यासाठी पहाटेपासूनच स्नान करून प्रत्येक मुस्लिमबांधव छावणीच्या मुख्य ईदगाहसह काहीजण रोजाबाग, उस्मानपुरा व इतर ठिकाणच्या ईदगाहवर नमाज अदा करण्यासाठी जमा झाले होते.
सकाळी ७ वाजेपासूनच छावणी ईदगाहवर मुस्लिम धर्मगुरुंद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले गेले. त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास विशेष नमाज अदा करण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे ईदगाहतील मंडपात उपस्थित राजकीय नेत्यांनी व पोलिस अधिकाऱ्यांसह समाजसेवकांनी मुस्लिम बांधवांना ईद उल फित्रच्या शुभेच्छा देत शिरखुर्म्याचा अस्वाद घेतला.