Sambhajinagar News : Complete the drain cleaning within eight days
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनचे आगमन होऊन पंधरा दिवस उलटले असले तरी शहरात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे महापालिकेला नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता. तरीदेखील अद्यापपर्यंत सफाईची कामे पूर्ण झालेली नसून, ही रखडलेली कामे आगामी आठवडाभरात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे कडक आदेश बुधवारी (दि. १७) स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी संबंधित विभागाला दिले.
सभापती मकरिये यांनी बुधवारी मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन, दुल्हा-दुल्हन चौक, संभाजीपेठ, नाथ मार्केट आणि सेना भवन परिसरातील नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. पाहणीदरम्यान नालेसफाईचे सुमारे ५० टक्केच काम पूर्ण झाल्याचे समोर आले. या संथ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ व कचरा न हटवल्यास पाणी तुंबून दुर्घटनांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमण करणाऱ्यांना तोडकामाचा इशारा
नालेसफाईच्या कामात सहकार्य न करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत, औषधी भवन व जनता बँक परिसरातील सफाईत अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर आवश्यक असल्यास तोडकामाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा मकरिये यांनी दिला. या पाहणी दौऱ्यात उपआयुक्त नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता अनिल तनपुरे, उपअभियंता आरती नवगीरे, सहायक आयुक्त रमेश मोरे आदी अधिकारी उपस्थित होते. शहर पूरमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी नाल्यांत कचरा टाकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सीसीटीव्हीचा 'वॉच'
नाल्यांमध्ये कचरा टाकणे आणि सांडपाणी सोडण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मोती कारंजा, गांधीनगर, औषधी भवन आणि नाथ मार्केट परिसरातील नाल्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश मकरिये यांनी दिले. याद्वारे नियमभंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी नाल्यांवर संरक्षक जाळ्या बसविण्याचे आदेशही त्यांनी दिले.