Sambhajinagar News: Brawl at the Garware counting center; a case registered against 150 people
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान चिकलठाणा येथील गरवारे हायटेक स्ट्रॉगरूम बाहेर भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत ईव्हीएममध्ये गडबड करून स्वतःच्या बहिणीला जिंकविल्याचा आरोप करत ११ महिलांसह १०० ते १५० जणांनी चांगलाच गोंधळ घातला होता. तासभर पोलिसांसह यंत्रणांना वेठीस धरण्यात आले होते.
जमाव जमवल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. १६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांच्या पराभवानंतर आक्रमक झालेल्या जमावाने तासभर मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातला होता.
अधिक माहितीनुसार, पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष शुक्रवारी मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना गरवारे हायटेक स्ट्रॉगरूम हॉलच्या बाहेर अचानक १०० ते १५० स्त्री-पुरुषांचा जमाव जमला. शहरात आचारसंहिता आणि पोलिस आयुक्तांचे मनाई आदेश लागू आहेत.
घटनास्थळी गोपनीय शाखेचे कामकाज पाहणारे पोलिस कर्मचारी विजय पोळ यांनी जमावाला आचारसंहिता सुरू असल्याची समज देऊन तिथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, जमावाने पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत तिथेच थांबून राहून आदेशाचे उल्लंघन केले.
संगीताबाई जाधव, आसराबाई कांबळे, सुनिता अंभोरे, अनिता येटाळे, छबाबाई शिंदे, पुष्पा ढेरे, पार्वती ढेरे, कडुबाई शिंदे, मोरेबाई, कलाबाई रगडे, विमलबाई उईके तसेच इतर १०० ते १५० अज्ञात महिला व पुरुष अशी आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक विष्णू मुंढे करत आहेत.