Sambhajinagar News : Bhagwantrao Deshmukh Award of Masap to Kalpana Dudhaal
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या भगवंतराव देशमुख विशेष वाङ्गयपुरस्कार आणि संध्या देशमुख - मुळे उत्कृष्ट ग्रंथालय, ग्रंथपाल पुरस्कारांची घोषणा मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी केली.
कै. भगवंत देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणारा पुरस्कार बोरीभडक (दौंड) येथील कल्पना दुधाळ यांच्या 'जारवा' या ललित लेखसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. या लेखांमधून लेखिकेने 'जारवा' म्हणजे रोपाच्या तंतुमुळांचा संभार, यात ओलाव्याबरोबरच रोपाच्या वाढीचे, रुजत जाण्याचे आश्वासनही असते असे कृषिसंस्कृतीचे जगण्यातले भावबंध टिपले आहेत. रोख ११ हजार, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संध्या देशमुख मुळे उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा नगर वाचनालयाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण ५ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.