मिसारवाडीतील नळ कनेक्शनच्या कॅम्पला भेट देत कामकाजाची पाहणी करताना आयुक्त अमोल येडगे. सोबत कर्मचारी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar water supply : नो नेटवर्क भागात नळ कनेक्शन देणे सुरू

मनपाचा मिसारवाडीत कॅम्प, आयुक्त येडगे यांनी केली पाहणी

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता महापालिकेने नो नेटवर्क भागात मोडणाऱ्या वसाहतींतील घरांना नळ कनेक्शन देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी मिसारवाडी परिसरात कॅम्प सुरू करण्यात आला असून आयुक्त अमोल येडगे यांनी कॅम्पला भेट देत प्रक्रियेची पाहणी केली.

महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून 'नो नेटवर्क एरिया'मधील नागरिकांना नवीन पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी संबंधित भागात जनजागृती तसेच नळ कनेक्शनसाठी आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि मालमत्ता कराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मिसारवाडी येथे शुक्रवारी हा कॅम्प सुरू करण्यात आला आहे.

आयुक्त येडगे यांनी शुक्रवारी मिसारवाडीतील या कॅम्पला प्रत्यक्ष भेट देत सुरू असलेल्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना 'नो नेटवर्क एरिया'मधील प्रत्येक नागरिकापर्यंत माहिती पोहोचवून नळ कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहित करा, असे निर्देश दिले.

दरम्यान, ज्या मालमत्तांना कर आकारणी करण्यात आली आहे. परंतु, त्यांनी कर थकविला असेल तर अगोदर कर भरणा करून घेणे. त्यानंतरच नळ कनेक्शन देण्यात यावे, असे आदेश आयुक्तांनी दिले. या परिसरातील ज्या मालमत्तांना अद्याप कर आकारणी झालेली नाही. त्यांना अगोदर कर आकारणी करणे. त्यानंतर कनेक्शन देणे, असे आदेश देखील आयुक्तांनी दिले आहेत.

या कॅम्पच्या पहिल्याच दिवशी १६ मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली असून, त्यांच्या मालमत्तांवर कर आकारणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच मालमत्ता कर आकारण्यात आलेल्या ३० मालमत्ताधारकांना थकीत कराचा भरणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिसारवाडीत कॅम्प २ दिवस

मिसारवाडी येथील हा विशेष कॅम्प शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस सुरू राहणार आहे. परिसरातील नागरिकांनी कॅम्पचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे व नळ कनेक्शन घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT