महानगरपालिका मुख्यालयात मोजक्याच वाहनांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने वाहनतळ ओस पडले असून, बाहेरील रस्त्यावर मात्र वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar municipal parking issue : मनपा मुख्यालयात अभ्यागतांसह अधिकाऱ्यांच्या वाहनांना प्रवेशबंदी

नगरसेवकांसह चार अधिकाऱ्यांच्या वाहनांना प्रवेश : प्रशासनाचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : महापालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून वाहनांसाठी अपुरी जागा असल्याने मनपा प्रशासनाने प्रवेशावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. आता नगरसेवकांसह चार अधिकाऱ्यांच्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मर्यादित वाहनांनाच परवानगी दिल्याने मुख्यालयाबाहेर वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.

शहर हद्दीत दुचाकी, चारचाकी वाहन पार्किंगची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र शहरात वाहनसंख्येच्या तुलनेत पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यावरच वाहन उभी करावी लागत असल्याने जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मनपा मुख्यालयात नवीन नियम आमलात आणला गेला आहे.

या नियमानुसार मोजक्या नगरसेवकांच्या वाहनांनाच प्रवेश दिला जात आहे. त्याचबरोबर आयुक्त, दोन अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या वाहनांनाच आता पार्किंगची मुभा देण्यात आली आहे. मात्र इतर अधिकारी, कर्मचारी आणि अभ्यागतांना बाहेरच वाहन उभे करावे लागत असून त्यातून गैरसोय वाढली आहे. मुख्यालयाबाहेरील रस्त्यांवरही पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांना वाहन उभे करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे दिवसभर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत असून सर्वसामान्यांना त्याचा फटका बसत आहे.

तसेच शहराच्या विविध भागांत पार्किंग सुविधा नसताना रस्त्यावर उभ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. आधी पार्किंगची सोय करा, मगच कारवाई करा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यालयातील पार्किंग निर्बंधामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून प्रशासनाने तातडीने पर्यायी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT