Sambhajinagar Municipal Corporation election campaign
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रमुख राजकीय पक्षांची मोठी गोची झाली आहे. यावेळी छत्रपती संभाजीनगरात सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. यातील कोणी कालपर्यंत महापालिकेत सत्तेत एकत्र होते. तर कोणी सध्या राज्याच्या सत्तेत सोबत आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप करायचे तरी कसे ? असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या २९ प्रभागांतून एकूण ११५ नगरसेवक निवडण्यासाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत एकमत न झाल्याने दोन्ही आघाड्यांमधील सर्वच घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत एकत्र असलेले भाजप, शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हे तिघेही इथे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
त्यासोबतच काँग्रेस, ठाकरेंची शिव सेना, शरद पवारांचा राष्ट्रवादी तसेच एमआयएम पक्षानेही आपापले उमेदवार स्वतंत्रपणे उतरविले आहेत. दोन दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र, आता एकमेकांवर आरोप करताना प्रमुख पक्षांची गोची झाली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन पक्ष राज्यात सत्तेत एकत्र आहेत. त्यामुळे त्यांना विकासाच्या मुद्द्द्यावरून एकमेकांना दोष देणे कठीण झाले आहे.
तशीच काहीशी अवस्था शिव-सेना उबाठा पक्षाचीही आहे. शिवसेना उबाठा पक्षही महापालिकेत गेली तीस वर्षे भाजपसोबत सत्तेत राहिलेला आहे. शिवसेना अखंड असताना जे पदाधिकारी शिवसेनेत होते, तेच आता दोन्ही शिवसेनेमध्ये विखुरलेले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासावरून दुसऱ्यावर बोट दाखवायचे ठरल्यास ते आपल्याकडेही येईल, अशी भीती या सर्वांनाच सतावते आहे.
आम्हाला विरोधकांवर टीका करायची गरज नाही. आम्ही शहरात असंख्य विकासकामे केली आहेत. काही कामे तीस तीस वर्षांपासून होत नव्हती ती कामेही आम्ही केली आहे. एकनाथ शिंदे यांनी या शहराच्या विकास कामांसाठी मोठा निधी दिला आहे, हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आम्ही ही निवडणूक विकासकामांच्या अजेंड्यावरच लढवत आहोत.- प्रदीप जैस्वाल, आमदार, शिवसेना
शहरात पाणी मिळत नाही, सर्वत्र रस्ते खोदून ठेवले आहेत. रुंदीकरणाच्या नावाखाली पाडापाडी केली, परंतु त्यांचा मोबदला दिला नाही. प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. शहरात महिला सुरक्षित नाहीत. नशेखोरी वाढली आहे. शहरासाठी मी ७९२ कोटींची पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती. परंतु भाजप आणि एमआयएमने ती बंद पाडली. त्यांचे मुख्यमंत्री आल्यावर नवीन मोठी योजना आणली. कशासाठी? मोठ्या योजनांमधून मोठा पैसा मिळतो म्हणून. या सर्व मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.चंद्रकांत खैरे, नेते, शिवसेना उबाठा.
आम्ही शहराच्या विकासावरच ही निवडणूक लढवीत आहोत. २०१४ सालापासून आम्ही शहरातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावला. शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे पाण्याचा. चंद्रकांत खैरे यांनी दहा वर्षे पाणी योजनेत काहीही केले नव्हते, परंतु आम्ही नवीन पाणीपुरवठा योजना आणून तीचे काम केले. आता येत्या दोन महिन्यांत शहराला मुबलक पाणी मिळणार आहे. उद्योगवाढीच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवरही आम्ही ठोस काम केले आहे.अतुल सावे, मंत्री, भाजप.
आम्ही शहर सुधाराच्या मुद्यांवर निवडणूक लढवत आहोत. शहरवासीयांना दररोज पाणी मिळाले पाहिजे. सध्या अतिक्रमणाच्या नावाखाली गोरगरिबांची घरे पाडली जात आहेत, हा अन्याय थांबविला पाहिजे. मनपाच्या शिक्षणाचा स्तर सुधारला पाहिजे. जितके पाणी तितकीच पाणीपट्टी आकारल्या जावी. तसेच महापालिकेच्या आरोग्य केंद्रांची परिस्थिती सुधारली पाहिजे. हेच मुद्दे घेऊन आम्ही मतदारांसमोर जात आहोत.शारेक नक्षबंदी शहराध्यक्ष, एमआयएम