sambhajinagar muncipal corporetion Gunthewari fee
महापालिकेने पाडापाडी झालेल्या भागांमध्ये गुंठेवारीचे शिबीर आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. पहिले शिबीर पडेगाव-मिटमिटा भागात घेण्यात आले. गुंठेवारीचे शुल्क रेडिरेकनर दरानुसार आकारले जाते अन् रस्त्यालगतच्या मालमत्तांचे रेडिरेकनर दर सर्वाधिक असल्याने एका मालमत्ताधारकाला गुंठेवारीसाठी किमान अडीच ते दोन लाख रुपयांचा खर्च येईल, हे ऐकूनच अनेक जण आवक झाल्याचा प्रकार बुधवारी (दि.३) या शिबिरात दिसून आला.
महापालिकेने पडेगाव ते शरणा पूर फाटा-दौतलाबाद टी पाइंट या रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणारी बेकायदा (परवानगी न घेता बांधलेली) बांधकामे जमीनदोस्त केली. यात रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या शेकडो मालमत्तांवर कारवाई करण्यात आली होती. यात काही मालमत्तांचा २० ते २५ टक्के भाग तर काहींचा शंभर टक्के आणि काहींचा ५० टक्के भाग बाधित झाला आहे. यातील बहुतांश बाधित मालमत्ताधारकांना मोबदल्याची प्रतीक्षा आहे.
त्यामुळे कारवाईच्या दीड महिन्यानंतर महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांनी येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यात त्यांनी नागरिकांच्या सर्व समस्या जाणून घेत पात्र मालमत्ताधारकांना मोबदल्याचे आश्वासन दिले. तसेच बेकायदा बांधकामधारकांना गुंठेवारी करून घेण्याची सूचना केली. त्यासाठी गुंठेवारी शिबीर पडेगाव, मिटमिटा भागात आयोजित केले जाईल, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार बुधवारी मिटमिटा येथील सरस्वती टॉवर येथे हे शिबीर घेण्यात आले. त्यांनी खर्चाची विचारणा केल्यानंतर रस्त्यालगतच्या मालमत्तांचे रेडिरेकनर दर काढून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुंठेवारी शुल्काची माहिती दिली. यात किमान एकाला अडीच ते पावणेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर काही जण वास्तुविशारदचे मोबाईल नंबर घेऊन परतले.
महापालिकेने पडेगाव-मिटमिटा भागातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या गुंठेवारी शिबिराला सकाळपासूनच नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला. महापालिकेचे अधिकारी, अभियंते आणि वास्तुविशारद अशी टीम या शिबिरात तळ ठोकून होती. दिवसभरात सुमारे ९७ मालमत्ताधारकांनी भेट देऊन गुंठेवारीसाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे, याची विचारणा केली.