पुंडलिकनगर ठाण्यासमोर जाधव यांनी अंगावर डिझेल ओतून घेतल्याचे दिसताच नागरिक व पोलिसांनी त्यांना रोखले. (छाया सचिन लहाने) pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : पुंडलिकनगर पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे ठाण्यासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी कारवाई होत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : जीविताला धोका, खंडणी आणि जिवे मारण्याच्या धमकीची अत्यंत गंभीर तक्रार देऊनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्याने थेट पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोरच अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.२४) दुपारी घडली. हेमंत अंबादास जाधव (जिल्हा सचिव, मनसे) असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून, उपस्थित नागरिक आणि पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पुंडलिकनगर पोलिसांच्या या बोटचेप्या भूमिकेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत जाधव यांनी ३० मार्च २०२६ रोजी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एक लेखी तक्रार दाखल केली होती. जाधव आणि त्यांच्या परिसरातील नागरिकांनी गल्लीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या कथित अतिक्रमणाविरोधात महापालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. याच रागातून संबंधित व्यक्तीने जाधव यांना त्रास देण्यास सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून जाधव यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून अतिक्रमण प्रकरणात पडू नकोस, अन्यथा परिणाम वाईट होतील. तुझ्या नावाची दोन लाखांची सुपारी दिली आहे, अशी थेट धमकी दिली जात होती.

इतकेच नव्हे तर संबंधित गुंडांकडून जाधव यांच्याकडे अडीच लाख रुपयांची खंडणीही मागण्यात आली होती. पैसे दिल्यास जीवितास धोका पोहोचणार नाही, असा दबावही त्यांच्यावर सातत्याने टाकला जात होता. या प्रकरणी जाधव यांनी पुंडलिकनगर पोलिसांचे दरवाजे ठोठावले, मात्र पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची साधी दखलही घेतली नाही.

पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच मोठे प्रश्नचिन्ह

पोलिसांच्या या निष्क्रियतेच्या निषेधार्थ आणि न्याय न मिळाल्याच्या नैराश्यातून संतप्त झालेल्या हेमंत जाधव यांनी अखेर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यासमोरच स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांना वेळीच अडवण्यात यश आले असले तरी या घटनेने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT